रत्नागिरी : पावसामुळे कोकण रेल्वेमार्गावर अनेक ठिकाणी अडथळे आल्यामुळे व मुंबईमध्ये पाण्यामुळे हाहाकार उडालेला असल्याने रेल्वे वाहतूक सोमवारीही विस्कळीत झाली होती. सोमवारी सहा गाड्या रद्द करण्यात आल्या असून चार गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले. दुपारी रत्नागिरीतून दिवा पॅसेंजर सोडण्यात आली. कोरेच्या गाड्या वेळेत धावत आहेत. रविवारी कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक चोवीस तासांसाठी बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे अनेक प्रवाशांचे हाल झाले. मुंबईतील पाणी ओसरल्यानंतर कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू करण्यात आली. आपटा-जिते स्थानकांदरम्यान मार्गावर आलेली दरड बाजूला करण्यात मध्य रेल्वेला यश आले आहे. कोकण रेल्वेमार्गावरील सहा गाड्या सोमवारी रद्द करण्यात आल्या. यामध्ये तिरुवेल्ली-जामनगर, कोचूवेल्ली-चंदीगड केरला संपर्क क्रांती एक्स्प्रेस, एर्नाकुलम-पुणे एक्स्प्रेस, चंदीगड-मडगाव गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेस, रत्नागिरी-मडगाव पॅसेंजर, लोकमान्य टिळक टर्मिनल-तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या.अमृतसर-कोचूवेल्ली एक्स्प्रेस ही उज्जैन, भोपाळ, नागपूरमार्गे वळवण्यात आली. निजामुद्दीन-एर्नाकुलम एक्स्प्रेस इगतपुरी-मनमाडमार्गे, मंगला एक्स्प्रेस ही त्रिसुरमार्गे, निजामुद्दीन सेंट्रल एक्स्प्रेस नागपूर-विजयवाडामार्गे वळवण्यात आली आहे.रत्नागिरी स्थानकातून दिवा पॅसेंजर दुपारी 2 वाजता रवाना करण्यात आली. पावणेतीन वाजता राजधानी एक्स्प्रेस रत्नागिरीतून रवाना करण्यात आली. त्याचप्रमाणे कोकणकन्या, राज्यराणी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस नियमित वेळेत धावत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
