रत्नागिरी : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामुग्री, साहित्य, औषध खरेदी करण्यासाठी तसेच सार्वजनिक ठिकाणे निर्जंतुक करण्यासाठी गरज पडल्यास जिल्हा वार्षिक योजनेतून निधी खर्च करण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. जनतेच्या आरोग्यासाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही असे रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी जाहिर केले आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सध्या संपूर्ण राज्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु या परिस्थितीला न घाबरता आपण सर्वांनी तोंड देण्याची गरज आहे. राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, मेडिकल स्टाफ, पोलिस व इतर सर्व कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत आहेत. रत्नागिरीतील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मला वैयक्तिकरित्या येण्याची इच्छा असूनही अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान माझ्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याने वैद्यकीय सल्ल्यानुसार मला तिकडे येता आले नाही. परंतु रत्नागिरीतील परिस्थितीवर सध्या मी बारीक लक्ष ठेऊन आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून परिस्थितीचा आढावा घेत आहे. जिल्हयातील वैद्यकीय कर्मचारी, प्रशासन, पोलीस यंत्रणा खूप मेहनत घेत असून त्यांना जनतेने संपूर्ण सहकार्य करणे गरजेचे आहे. रत्नागिरीतील या परिस्थितीला तोंड देण्यासाठी योग्य त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. रत्नागिरीतील जनता घरी राहून शासनाला सहकार्य करेल असा मला ठाम विश्वास आहे असे मत रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परब यांनी व्यक्त केले आहे.
