जिल्ह्यात तीन दिवसांत ११ लाख २९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल

0

रत्नागिरी: करोनाच्या प्रतिबंधासाठी संचारबंदी लागू झाल्यानंतरही गेल्या तीन दिवसांत रत्नागिरी जिल्ह्यात तीन हजार १२१ वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे तसेच संचारबंदीचे उल्लंघन केले. त्यांच्याकडून अकरा लाख २९ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती रत्नागिरीचे वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी दिली. संचारबंदीच्या काळात वाहने रस्त्यावर येऊ नयेत, याकरिता प्रतिबंध करण्यात आला आहे. पेट्रोल पंपांवर केवळ दुचाकी वाहनांनाच पेट्रोलचा पुरवठा करण्यात येणार आहे. सकाळी १० ते दुपारी १ आणि सायंकाळी ४ ते ६ या वेळेतच पेट्रोल पुरविले जाणार आहे. रिक्षा, चारचाकी वाहने आणि मोठ्या वाहनांना इंधनाचा पुरवठा केला जाणार नाही. असे प्रतिबंध केल्यानंतर रस्त्यांवरील वाहनांची संख्या कमी होईल, अशी अटकळ होती. मात्र दुचाकी वाहनांना पेट्रोल पुरविले जात असल्याने अनेक दुचाकी वाहने रस्त्यांवर विनाकारण फिरत आहेत. सर्वच वाहनांची तपासणी करण्यासाठी ठिकठिकाणी पोलिसांची तपासणी नाकी सुरू आहेत. तेथे प्रत्येक वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. त्यात दुचाकी वाहनांचे प्रमाण अधिक आहे. अत्यावश्यक वस्तूंची खरेदी, औषधांची खरेदी, डॉक्टर आणि हॉस्पिटलमध्ये जाण्यासह संचारबंदीच्या काळात ठरवून दिलेले योग्य कारण वगळता इतर कोणत्याही कारणासाठी वाहने चालविली जात असल्याचे पोलिसांच्या तपासणीत आढळून आले. अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. मूळ मोटर वाहन कायद्याचा भंग केल्याच्या संदर्भातच ही कारवाई होती. त्यामध्ये हेल्मेटविना दुचाकी चालवणे, सीटबेल्टशिवाय चारचाकी गाडी चालविणे, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, परवान्याशिवाय वाहन चालविणे, चुकीच्या बाजूने वाहन चालविणे, फॅन्सी नंबर प्लेट, धोकादायक वाहनचालन, चुकीचे पार्किंग, योग्य ती कागदपत्रे सोबत नसणे, प्रवेशबंदीच्या मार्गावर वाहन चालविणे, दुचाकीवरून तिघांचा प्रवास, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, रिफ्लेक्टर नसणे अशा गुन्ह्यांसाठी हा दंड करण्यात आला. पहिल्या दिवशी २३ मार्च रोजी एक हजार ६१४ वाहनचालकांकडून सहा लाख २९ हजार ६०० रुपये, २४ मार्च रोजी एक हजार २१९ वाहनचालकांकडून चार लाख १५ हजार ४०० रुपये, तर गुढीपाडव्याच्या दिवशी दुपारी एक वाजेपर्यंत २८८ वाहनचालकांकडून ८४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here