साटेली-भेडशी : नागपंचमीच्या सणादिवशीच पतीकडून पत्नीचा खून झाल्याची घटना झरेबांबर-काजूळवाडीत सकाळी 9 वा. घडली. ज्ञानेश्वर देऊ पेडणेकर (वय 55) याने आपली पत्नी सौ. नम्रता ज्ञानेश्वर पेडणेकर (50) यांचा चाकूने वार करीत निर्घृणपणे खून केला. ज्ञानेश्वर याला भादंवि कलम 302 अन्वये खुनाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. नागपंचमी दिवशीच ही घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दोडामार्ग पोलिस ठाण्यातून व पेडणेकर कुटुंबीयांच्या शेजार्यांकडून मिळालेली माहिती अशी की, पेडणेकर कुटुंबीय गेल्या अनेक वर्षांपासून काजूळवाडीत राहतात. घरात ज्ञानेश्वर हे या ना त्या कारणांमुळे वाद करायचे. दोन्ही मुलगे कमावते झाल्याने किरण हा मोठा मुलगा भेडशी येथे, तर समीर हा गोव्याला कामाला असतो. ज्ञानेश्वर पेडणेकर हे सतत दारूच्या नशेत असायचे. पत्नीशी भांडण, मारहाण करणे हे वारंवार होतच होते. दोन्ही मुलांनी वडिलांची वेळोवेळी समजूत काढण्याचा प्रयत्न केला; पण वडील सुधारत नव्हते. दोन महिन्यांपूर्वीच पत्नीला मारहाण केल्याने नाकाला मार लागला होता. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रारदेखील पत्नीने दिली होती. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी वारंवार देत असल्याने त्या माहेरी राहत होत्या. वडिलांचा त्रास आपल्या आईला सतत होत असल्याने मुलांनी आईस गोवा-खरपाल येथील तिच्या माहेरी सुखरूप ठेवले होते. सोमवारी नागपंचमी सण असल्याने सौ. नम्रता काजूळवाडीमध्ये आल्या होत्या. रविवारी रात्री त्यांच्याशी ज्ञानेश्वर यांनी भांडण केले. मोठ्या मुलाने वेळीच हस्तक्षेप करून भांडण थांबविले होते. सोमवारी सकाळी नागपंचमी सण असल्याने सौ. नम्रता या घरासमोरील बोअरवेलवर पाणी आणण्यासाठी गेल्या होत्या. तर मोठा मुलगा किरण नागमूर्ती आणण्यासाठी वाडीतील चित्रशाळेत गेला होता. हीच संधी साधून ज्ञानेश्वर यांनी चाकूच्या साहाय्याने पत्नीवर सपासप वार केले. रक्ताळलेल्या अवस्थेतच घर गाठण्याचा प्रयत्न केला; पण उंबरठ्यापर्यंत पोहोचताच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर घटनास्थळी उशिरा पोचलेल्या किरणचा आपल्या आईसाठी असलेला आक्रोश पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. तसेच मृतदेहाशेजारी किरण बसून एकसारखा रडत होता. संशयित आरोपी ज्ञानेश्वर घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना ग्रामस्थांनी पकडून झाडाला बांधून ठेवले होते. पोलिस घटनास्थळी आले व ज्ञानेश्वर यांना अटक केली. तर घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक सुनील थोपटे, उपनिरीक्षक सुजीत घाटगे, रायगौडा पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते. पत्नीचा ज्या चाकूने खून करण्यात आला तो चाकू घरापासून शंभर मीटर अंतरावर ग्रामस्थांना सापडला.पोलिसांनी तो जप्त केला. पोलिस ठाण्यात किरण पेडणेकर यांनी फिर्याद दिली आहे.
