टी20 सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय, मालिकेतही बरोबरी

0

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात चौथा टी20 सामना राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर शुक्रवारी खेळवला गेला.

मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी हा सामना इंडियासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. दरम्यान महत्त्वाचा सामना मोठ्या फरकाने जिंकत भारताने मालिकेत बरोबरी साधली आहे. आता मालिकेत दोन्ही संघाचा स्कोर 2-2 असून रविवारी (19 जून) होणाऱ्या फायनल सामन्यात मालिकेचा रिझल्ट समोर येईल. या सामन्यात फलंदाजीत कार्तिक-पांड्या जोडीने तर गोलंदाजीत आवेश खानने चमकदार कामगिरी केली.

दक्षिण आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. त्यांनी गोलंदाजीही चांगली केली. ऋतुराज, अय्यर, पंत स्वस्तात बाद झाले. ईशानही 27 धावाच करु शकला. पण हार्दिकने 31 चेंडूत 46 धावा ठोकल्या तर दिनेशने कारकिर्दीतील पहिलं टी20 अर्धशतक झळकावत 27 चेंडूत 55 धावा केल्या. अक्षरने चौकार ठोकत डाव संपवला. ज्यामुळे विजयासाठी द. आफ्रिकेसमोर भारताने 170 धावांचे लक्ष्य ठेवले. द. आफ्रिकेकडून इंगिडीने 2 तर मार्को, प्रिटोरियस, महाराज आणि नॉर्खिया यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

आवेशची भेदक गोलंदाजी
170 धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिका संघाची सुरुवातच खराब झाली. त्याच्या एकाही खेळाडूला खास कामगिरी करता आली नाही. रासी डस्सेन याने केलेल्या 20 धावा संपूर्ण संघातील खेळाडूंमध्ये सर्वाधिक ठरल्या. दुसरीकडे भारतीय गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी सुरुच ठेवली. सर्वच गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. पण आवेश खानने सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत 4 षटकात 18 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. ज्यानंतर 16.5 षटकात दक्षिण आफ्रिकेचे 9 गडी बाद झाले. तर कर्णधार बावुमा दुखापतीमुळे खेळू शकला नाही. अशारितीने 87 धावांच्या मोठ्या फरकाने भारताने सामना जिंकला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:46 AM 18-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here