जिल्हा परिषद, पंचायत समित्यांची प्रभाग रचना करण्याचे काम अंतिम टप्प्यात

0

रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रभागरचना अंतिम करण्याचे काम सध्या पूर्णत्वास जात आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार असून त्यानंतर गट व गणांची आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आरक्षणाची इच्छुकांना उत्कंठा लागून राहिली आहे. अनेकांनी तर आपल्याला सोयीचे आरक्षण पडण्यासाठी देव पाण्यात घातले आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाच्या प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती घेण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, हरकतींवर कोकण आयुक्त कार्यालयात याची सुनावणीची प्रक्रिया होणार आहे. या प्रक्रियेनंतर विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे राजकीय पदाधिकार्‍यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान, जूनच्या शेवटच्या आठवड्यात अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. लोकसंख्येच्या निकषानुसार जिल्हा परिषदेमध्ये आता नव्याने 7 गटांची वाढ झाल्याने 62 गट तर पंचायत समितीमध्ये नव्याने 14 गण वाढल्याने 124 गण निर्माण झाले आहेत. अनेक विद्यमान सदस्यांच्या गट व गणांचे अस्तित्व संपले आहे. तर काही ठिकाणी नव्याने गटाची आणि गणाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे निवडणुकीसाठी इच्छुक असणार्‍यांच्या नजरा आता गट आणि गणाच्या आरक्षण सोडतीकडे लागल्या आहेत.

गेल्या पंच वार्षिक निवडणुकीचा विचार केल्यास 55 गटांसाठी निवडणूक पार पडली होती. यामध्ये 28 गट हे महिलांसाठी आरक्षित होते. आता गट व गणांची प्रभाग रचना अंतिम टप्प्यात आली असून जूनच्या शेवटच्या आठवड्यात त्यावर शिक्कामोर्तब होणार आहे. जिल्ह्याधिकार्‍यांनी अंतिम गट व गणांची जाहीर केल्यानंतर खर्‍या अर्थाने गट व गणांच्या आरक्षणाचा विषय समोर येणार आहे. जिल्ह्यात गट व गणाच्या रचनेच्या दिव्यातून बाहेर पडलेल्या इच्छुकांना आता आरक्षणाचे डोहाळे लागले आहेत.
गट व गणाच्या आरक्षणावरूनही गावोगावी आता चर्चाना ऊत आला आहे. गट व गण आरक्षीत झाल्यास अथवा महिलांसाठी राखीव राहिल्यास इच्छुकांच्या मनसुभ्यावर पाणी फिरणार असले तरी कोणत्याही परिस्थितीत गट व गण आरक्षीत होवू नयेत यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:31 AM 23-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here