एकनाथ शिंदेंचं नव्या पत्रासह नवं ट्वीट..

0

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलहामुळं महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळणार की, काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवसेनेतील एकापाठोपाठ एक आमदार शिंदे गटाकडे रवाना होत आहेत. एवढंच नाहीतर, काही खासदार आणि नगरसेवकांचाही ओढा शिंदे गटाकडे असल्याचं पाहायला मिळत आहे.

IMG-20220514-WA0009

मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्यानंतरही एकनाथ शिंदे आणि आमदारांचा गट आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांचं एक पत्र एकनाथ शिंदेंनी ट्वीट केलं आहे. तसेच हे पत्र ट्वीट करताना एकनाथ शिंदे यांनी “ही आहे आमदारांची भावना”, असं कॅप्शन दिलं आहे.

शिवसेना बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतंय. या पत्रातून शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना खरमरीत पत्र लिहून आमदारांना अपमानास्पद वागणूक दिल्याचा आणि मुख्यमंत्र्यांना बडव्यांनी घेरल्याचा घणाघाती आरोप केला आहे. एवढंच नाहीतर, सरकारची अडीच वर्ष आमच्यासाठी वर्षाची दारं बंद होती. अनेकदा तासन् तास आम्हाला वर्षाच्या गेटवर वाट बघायला लागली, असा आरोपही शिरसाट यांनी केला आहे.

एवढंच नाहीतर शिरसाट यांनी पत्रातून संजय राऊतांवरही नाव न घेता निशाणा साधला आहे. आमच्या जीवावर राज्यसभेवर जाणाऱ्या बडव्यांनी तुम्हाला घेरलं असल्याचं म्हणत संजय शिरसाट यांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.

काय म्हटलंय संजय शिरसाट यांनी पत्रात?

काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण आमच्यासाठी तर सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही.

मतदारसंघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे अशी अनेक वेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप बडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. वटव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो.

तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून येणाऱ्या आम्हा स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक का हा आमचा सवाल आहे?

हीच सर्व हाल अपेक्षा आम्ही सर्व आमदारांनी सहन केली. आमची व्यथा, आपल्या आजूबाजूचे बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही, किंबहुना आपल्यापर्यंत ती पोहोचवली सुद्धा जात नव्हती. मात्र याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचा दरवाजा उघडा होता. मतदार संघात असलेली वाईट परिस्थिती, मतदार संघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान… आमची ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते आणि सकारात्मक मार्ग काढत होते. त्यामुळे आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना, आम्ही हा निर्णय घ्यायला लावला.

हिंदुत्व, अयोध्या, राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेंव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं? तुम्ही स्वतः फोन करुन अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका असे सांगितले. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकान्यांचे लगेज चेक इन झाले होते, आम्ही विमानात बसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितले की, आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वतः परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितलं की, सीएम साहेबांचा फोन आला होता आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतले आणि आपले घर गाठले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामलल्लांचं दर्शन का घेऊ दिले नाही?

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:16 PM 23-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here