चिपळुणातील १९६५ पासूनच्या महापुराचा होणार अभ्यास

0

चिपळूण : कोयना वीज प्रकल्प पूर्ण होण्याआधी आणि त्यानंतर आलेल्या पुरांचा तौलनिक अभ्यास करावा. त्याच पद्धतीने या कालावधीतील सर्व आकडेवारी गोळा करून ती मांडून त्या संदर्भात शासनाला अहवाल द्यावा. ज्यावेळी ४०० मि.मी. पेक्षा अधिक पाऊस पडेल त्यावेळी किती पाणी जमा होऊ शकेल आणि अशावेळी कोयनेचे अवजल सोडण्याबाबत काय उपाययोजना कराव्यात, याबाबत शासनाला अभ्यासाअंती अहवाल देण्यात येईल, असे अभ्यास गटाच्या दुसऱ्या बैठकीमध्ये ठरले.

IMG-20220514-WA0009

पोफळी येथील महाजनकोच्या कार्यालयात बुधवारी सायंकाळी झालेल्या बैठकीसाठी अभ्यास गट समितीचे अध्यक्ष अभियंता दीपक मोडक, महाजनकोचे मुख्य अभियंता संजय चोपडे, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता वैशाली नारकर, मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे, स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. शरद जोशी, सामाजिक कार्यकर्ते संजीव अणेराव,
कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन पोतदार, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, निमंत्रित सदस्य सतीश कदम, किशोर रेडीज आदी समिती सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत १९६५, १९८९, १९९२, २००५ आणि २०२१ मध्ये चिपळुणात आलेल्या महापुराच्यावेळी पाऊस किती पडला, कोयनेतून पाणी कसे सोडले, १९६५ पासून शहराचा झालेला विस्तार, नद्यांची पाणी वहन क्षमता, पर्जन्यवृष्टी अशा सर्व स्तरातून आकडेवारी गोळा केली जाणार आहे व त्याचा अभ्यास समितीच्या माध्यमातून केला जाणार आहे. या अभ्यासाअंती शासनाला अहवाल देण्यात येणार आहे.

यामध्ये आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबतही समिती शासनाला अहवाल देईल. जर ४०० मि.मी. पेक्षा जास्त पाऊस झाला व अशा पावसाच्यावेळी वाशिष्ठीच्या खोऱ्यात किती प्रमाणात पाणी गोळा होईल याचा अभ्यासदेखील केला जाणार आहे, अशी परिस्थिती निर्माण झाल्यास कोळकेवाडीतून सोडण्यात येणाऱ्या अवजलाचे काय नियोजन करायचे या बाबतही अभ्यास करून शासनाला अहवाल देण्यात येणार आहे. अभ्यास गटाची पुढील बैठक १२ जुलैच्या सुमारास होणार आहे आणि या नंतरच शासनाला अहवाल देण्यात येईल असे सूत्रांनी दिलेल्या माहितीतून पुढे येत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:06 PM 23-Jun-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here