आपण चुकीचे तर वागत नाही आहोत ना ?…

0

मागील दोन दिवसांच्या तुलनेत आज रत्नागिरीत थोडी शिथिलता पहावयास मिळाली. जीवनावश्यक वस्तूंसाठी नागरिक घराबाहेर पडत होते. कुणी वाहतुकीची परवानगी मागत होते, कुणी आंबा विक्रीची तर कुणी मच्छी विक्रीची. सर्वांचेच नुकसान होतंय यात शंकाच नाही. पण यातून काही अघटीत घडू नये हीच परमेश्वराजवळ प्रार्थना. आज पोलिसांनी देखील बंदोबस्तात शिथिलता दिलेली पहावयास मिळाली. कुणाला दवाखान्यात जायचय, कुणाला किराणामालाच्या दुकानात तर कुणाला भाजी आणायला. सर्वांचीच कारणं योग्य आहेत. पण…हा पण आज काही वाचनात आलेल्या तथ्यांवरून फारच सतावू लागलाय. खरंच हे काही चाललंय ते योग्य चाललंय ना ? हि चिंता मनात निर्माण झाली आहे म्हणूनच इतक्या रात्री हे लिहावसं वाटलं. आजच्या घडीला जगात काय परिस्थिती आहे याची माहिती घेताना काही गोष्टी पुढे आल्या. कोरोना प्रभावित देशांमध्ये आता तिसऱ्या क्रमांकावर अमेरिका आहे. पहिल्या आणि दुसर्या क्रमांकार इटली आणि स्पेन आहे. अमेरिकेत आजवर ७० हजार लोकं कोरोना लागण झालेले असून १ हजार पेक्षा जास्त लोकं मरण पावले आहेत. कोरोनाचा सर्वात जास्त प्रभाव न्यूयॉर्कमध्ये आहे. आजपर्यंत येथे २० हजार पेक्षा जास्त नागरिक लागण झालेले आहेत. या ठिकाणी जाणूनबुजून जे कोरोना संक्रमित करतात त्यांच्यावर आतंकवादाचा आरोप लावण्यात येतो. इटलीत आजवर ७५०३ लोकं मरण पावले आहेत आणि करोना लागण झालेल्यांची संख्या ७४ हजार ३८६ वर पोहचली आहे. १५ फेब्रुवारी ते २७ फेब्रुवारी दरम्यान या येथे कोरोना संक्रमण अतिशय मंद गतीने होत होतं. २७ फेब्रुवारी पासून जो आलेख उंचावत गेला तो अजूनही थांबला नाही. स्पेन मध्ये ४ हजार पेक्षा जास्त लोक मेले आहेत. ५६ हजार नागरिक संक्रमित आहेत. सार्वजण घरात बंद आहेत. हे देश भारतापेक्षा खूप प्रगत आहेत. तेथील वैद्यकीय सुविधा अत्यंत प्रगत आणि चांगल्या आहेत. जरा आपल्याकडे बघा…आपण कुठे आहोत ? आपण अजूनही तितक्या गांभीर्याने हा विषय घेत नाही आहोत का ? एक शंकेची पाल चुकचुकली…आपण चुकीचे तर वागत नाही आहोत ना ?

हेमंत वणजु
संपादक : रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
12:37 AM 27/Mar/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here