दूरदर्शनवर कोणे एके काळी लोकप्रियतेच सर्व उच्चांक मोडलेल्या रामायण आणि महाभारत या मालिका पुन्हा एकदा प्रसारित केल्या जाणार असून त्यासाठी करोना हे कारण ठरले आहे. देशात सर्वत्र लॉक डाऊन केला गेल्याने लोकांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. करोना प्रसारामुळे उद्योगधंदे बंद आहेत तसेच बॉलीवूड आणि टीव्हीसाठीचे शुटींगही बंद पडले आहे. नवीन चित्रपट जसे रिलीज होत नाहीत तसेच टीव्हीवर मालिकांचे नवे भाग प्रसारित होऊ शकत नाहीत. पुढच्या भागांचे शुटींगच होऊ शकत नसल्याने ही परिस्थिती ओढवली असून ती अजून किती दिवस राहील, हे आत्ताच सांगता येणार नाही. त्यामुळे, रामायण व महाभारत या मालिका दूरदर्शनवर रिपीट टेलीकास्ट केल्या जातील आणि त्याचा टाईम स्लॉट लवकरच जाहीर केला जाईल, असे प्रसारभारतीचे शशीशेखर यांनी म्हटले आहे.
