सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस

0

कणकवली : गेले चार दिवस मुसळधार कोसळणार्‍या पावसाने रविवारी रात्रीपासून अधिकच जोर धरला. अविरत कोसळणार्‍या या पावसामुळे जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, बहुतांश वाहतूक संपर्क खंडित झाला आहे. यामुळे जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रमुख जिल्हा मार्गांसह अनेक ग्रामीण मार्गावरील कॉजवे, पूल पाण्याखाली गेले आहेत. तर, काही ठिकाणी रस्त्यांवर झाडे पडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. या पावसामुळे जीवितहानीचे वृत्त नाही. मात्र, काही ठिकाणी वादळी वार्‍यांमुळे घरांवर झाडे पडून नुकसान झाले आहे. याबरोबरच ग्रामीण भागातील वीज व दूरध्वनी सेवाही ठप्प झाली असून, समुद्रातील उधाणाचा जोर कायम आहे. देवबाग गावाला तीन दिवसांत दुसर्‍यांदा उधाणाचा तडाखा बसला. जिल्ह्यात गेले आठ दिवस संततधार पाऊस कोसळत आहे. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे जिल्ह्यातील सर्वच नदीनाले दुथडी भरून वाहत असून, अनेक ठिकाणी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यामुळे नदीकाठांवरील वस्त्यांमध्ये पाणी घुसले आहे. सोमवारी भंगसाळ नदीला महापूर आल्याने कुडाळ शहरातील आंबेडकरनगरातील अनेक घरांमध्ये पाणी घुसून साहित्य व अन्‍नधान्याचे नुकसान झाले. प्रशासनाने या नागरिकांना वेळीच सुरक्षित स्थळी हलविले. तर तेरेखोल नदीला आलेल्या पुराचे पाणी बांदा शहरासह मडुरा व सातार्डा पंचक्रोशीतील गावांमध्ये घुसले. यामुळे परिसरातील बागायती व भातशेती पाण्याखाली गेली आहे. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोर्‍यातील सुमारे 30 ते 32 गावांचा संपर्क सलग चौथ्या दिवशीही खंडित होता. या खोर्‍याला जोडणारे कुडाळ-आंबेरी हे महत्त्वाचे पूल गेले दोन दिवस पाण्याखाली असल्याने माणगाव खोरे संपर्कहीन झाले आहे. भुईबावडा घाटात पडझडीच्या किरकोळ घटना घडल्या असून भुईबावडा बाजारपेठेनजीक महाकाय वटवृक्ष कोसळल्याने गगनबावडा-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प होती. मालवण तालुक्यातील मसुरे परिसराला वादळी पावसाचा तडाखा बसला. गावातील अनेक घरांवर झाडे पडली असून यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वायरी-मक्रेबाग येथे एका घराचे छप्पर पूर्णपणे जमीनदोस्त झाले. तर कालावल खाडीला पूर आल्याने मसुरे खोतजुवा बेटाला पाण्याने वेढा दिला आहे. या बेटावरील रहिवासी भीतीच्या छायेखाली आहेत. कणकवली-आचरा मार्गावर वरवडे येथे पाणी आल्याने हा मार्ग अनेक तास ठप्प होता. तर सातरल-कासरल मार्गावर दिवसभर पाणी असल्याने या गावांचा संपर्क तुटला होता. सायंकाळी उशिरा जानवली पुलानजीक महामार्गावर दोन वृक्ष कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पावसाचा कायम असलेला जोर व पाण्याखाली गेलेले पूल यामुळे सोमवारी जिल्हाभरातील एसटीच्या शेकडो फेर्‍या रद्द कराव्या लागल्या. कोल्हापूर जिल्ह्यातही पावसाचा जोर कायम असून कोल्हापूर व कोकण जोडणारे गगनबावडा व राधानगरी हे दोन्ही मार्ग पाण्याखाली गेले आहेत. परिणामी उत्तर कोकणचा कोल्हापूरशी असलेला संपर्क तुटला आहे. सोमवारी फोंडाघाटमार्गे होणारी वाहतूक वारंवार खंडित होत होती. तर करूळ घाटमार्गे होणारी वाहतूक गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून कोल्हापूरकडे होणारी बहुतांशी वाहतूक आंबोली घाटमार्गे वळविण्यात आली. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here