राजापूर : पूरस्थिती असतानाही शहरानजीक केळवडे पाथर्डे रोडवरील ओहळावर पोहण्यासाठी गेलेल्या राजापूर आगारातील एसटी चालक व्यंकट मारुती घुले (वय 35, रा. डोंगर कशेळी, ता. उदगीर, जि. लातूर) याचा या ओहळातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली आहे. तर, अन्य दोन जण बचावले असून त्यांच्यावर राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजापूर आगारातील चालक व्यंकट मारुती घुले, गोविंद बाबाजी दहीफळे व व्यंकया लक्ष्मण शिरसाट हे तिघेजण सोमवारी दुपारी 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान पोहण्यासाठी राजापूर केळवडे पाथर्डे मार्गावर नव्याने ज्या ठिकाणी पर्यायी मोरी बांधण्यात आली आहे, त्या ठिकाणी गेले होते. या ठिकाणी नव्याने टाकण्यात आलेल्या मोरीमुळे पाणीसाठा होत असून या पाण्यात हे पोहण्यासाठी उतरले होते. मात्र मुसळधार पडणारा पाऊस आणि त्यामुळे अचानक पाणी वाढल्याने यातील व्यंकट मारूती घुले हा या पाण्यात काहीसा पुढे वाहत जात बुडाला. तर त्याचे अन्य दोन सहकारी देखील या पाण्यात बुडू लागले. याचदरम्यान या ठिकाणी राजापूर आगारातील एक कर्मचारी व त्याचा अन्य सहकारी गेले असताना पाण्यात हे तिघेजण बुडत असल्याचे आढळून आले. त्या दोघांनीही तात्काळ पाण्यात उड्या मारत या दोघांना बाहेर काढले. मात्र व्यंकट हा पाण्यात खोलवर बुडाल्याने त्याचा मृत्यू झाला. व्यंकट यासह त्या दोघांना घेऊन या दोघांनीही तात्काळ राजापूर ग्रामीण रूग्णालय गाठले. मात्र पोटात पाणी गेल्याने व्यंकट हा मृत असल्याचे राजापूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. राम मेस्त्री यांनी सांगितले. अन्य दोघांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. मेस्त्री यांनी सांगितले.
