बंडखोर शिवसेना आमदार आज मुंबईत परतणार

0

मुंबई : एकनाथ शिंदे आणि आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणात वादळ आलं. याच बंडखोरीमुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राजकीय हालचालींनी वेग घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री मिळाले, राज्यात शिंदेपर्व सुरु झालं. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अखेर गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला.

एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला मात्र त्यावेळी त्यांना पाठिंबा देणारे सर्व बंडखोर आमदार गोव्यात होते. त्यांनी शपथविधी लाईव्ह पाहिला. पण हे सर्व आमदार मुंबईत कधी परतणार हा प्रश्न सर्वांना पडला होता. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सर्व आमदार आज (शनिवारी) मुंबईत परतणार असल्याचं सांगितलं.

शपथविधीनंतरपासूनच नवं सरकार अॅक्शनमोडमध्ये असल्याचं पाहायला मिळालं. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल बैठका आटोपल्यानंतर मध्यरात्री दोन वाजता गोव्याकडे निघाले आणि पहाटे 4 वाजता पणजीत पोहोचले. गेले तीन दिवस गोव्यात मुक्कामाला असलेल्या 50 समर्थक आमदारांना घेऊन शिंदे आज दुपारनंतर मुंबईकडे रवाना होणार आहेत. उद्यापासून विधानसभेचं दोन दिवसांचं अधिवेशन होणार आहे. त्याआधी शिंदे समर्थक आमदार आजच मुंबईत पोहोचतील. एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे या आमदारांसोबत गोव्यात आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी संध्याकाळी शपथविधी पार पडल्यानंतर रात्री गोवा गाठलं होतं. काल दुपारनंतर ते मुंबईत परतले. संध्याकाळी बैठका आटोपून ते पुन्हा गोव्याला रवाना झालेत.

आज शिंदे गटातील सर्व बंडखोर आमदार मुंबईत परतणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिंदे गट सध्या गोव्यातील ताज कन्व्हेंन्शन सेंटर या हॉटेलमध्ये मुक्कामी आहे. आजच गोव्यातून हे बंडखोर आमदार मुंबईत परतण्याची शक्यता आहे. या बंडखोरांच्या स्वागतासाठी भाजपनं जय्यत तयारी केली आहे. दुसरीकडे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी सीआरपीएफचे दोन हजार जवान मुंबईत तैनात आहेत. त्यामुळे कडक सुरक्षाव्यवस्थेत शिंदे गटाची घरवापसी होण्याची शक्यता आहे.

बंडखोरांविरोधात शिवसैनिक आक्रमक होत असताना शिवसेना नेत्यांकडूनही आक्रमक भाषण केली जात होती. त्यामुळे बंडखोर मुंबईत अथवा राज्यात आल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. शिवसैनिकांच्या आक्रमक भूमिकेमुळे बंडखोर आमदारांना केंद्रीय सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याची घोषणा करताना शिवसैनिकांना शांततेचे आवाहन केले होते. त्यानंतर आक्रमक शिवसैनिक मवाळ झाल्याचे चित्र दिसून आले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 02-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here