आंबा महोत्सवातून 17 कोटींची उलाढाल

0

रत्नागिरी : राज्य कृषी पणन मंडळाद्वारे एकवीस वर्षांपासून पुण्यासह महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये आंबा महोत्सवाचे आयोजन यशस्वीपणे करण्यात येत आहे. यंदा आंबा महोत्सवाची नुकतीच सांगता झाली असून राज्यात सुमारे १७ कोटी रुपयांच्या आंब्याची थेट विक्री उलाढाल झाली. यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील सुमारे ७० हून अधिक आंबा बागायतदार सहभागी झालेले होते. कोरोनामुळे मागील दोन वर्षांत प्रत्यक्ष आयोजन न झाल्यामुळे यंदाची उलाढाल बागायतदारांसाठी उमेद वाढवणारी ठरली.

कृषी पणन मंडळामार्फत दरवर्षीप्रमाणे उत्पादक ते ग्राहक थेट विक्री योजनेअंतर्गत आंबा महोत्सवाचे आयोजन २००२ पासून राज्यात विविध ठिकाणी करण्यात येते. विक्री व्यवस्थेतील मध्यस्थांची संख्या कमी करून शेतकर्‍यांना योग्य बाजारभाव व त्याचवेळी ग्राहकांना रास्त दरात चांगल्या गुणवत्तेचा माल मिळावा हा महोत्सवाचा उद्देश असतो. पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील वखार महामंडळाच्या जागेत यंदा एक एप्रिल ते तीन जून या कालावधीत महोत्सव झाला. तेथे ५१ स्टॉल आंबा उत्पादकांना उपलब्ध करून देण्यात आले होते. महोत्सवात सहभागी शेतकरी एकत्रितपणे आंबा विक्रीस आणतात. त्यात प्रति गटाचा अंदाजे पाच लाखांचा आंबा थेट विकला जातो. हाच आंबा बाजार समितीत विकल्यास अडते, कमिशन द्यावे लागते.

मोठ्या प्रमाणात आवक झाल्यास दर पडतात. त्यामुळे आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. महोत्सवाचे चित्र रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील सुमारे ७० हापूस आंबा उत्पादक यंदाच्या महोत्सवात सहभागी झाले. यंदा हंगामाच्या सुरुवातीस म्हणजे मार्च एप्रिलमध्ये आवक कमी होती. त्यामुळे दरही जास्त होते. वजन आणि दर्जानुसार ७०० चे १२०० रुपये प्रति डझन दर होते. अवकाळी पाऊस, दिवसा कडकडीत ऊन व रात्रीचा गारवा असे हवामानातील बदल ही आवक कमी असण्याची कारणे होती. एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यात आवक वाढून दरही कमी होऊ लागले. एप्रिलच्या शेवटचा आठवडा ते मेच्या पहिल्या आठवड्यापासून आवकेत मोठी वाढ होऊन दर प्रति डझन ५०० ते ७०० रुपयांदरम्यान तर मे व हंगामाच्या अखेरच्या टप्प्यात ते ३०० ते ५०० रुपयांच्या दरम्यान राहिले. महोत्सवात सुमारे दोन लाख डझनांपेक्षा जास्त आंबा विकला गेला. पुण्यामध्ये सुमारे १३ कोटी रुपयांची उलाढाल झाली तर अन्य जिल्ह्यांमध्ये आयोजित महोत्सवात सतरा कोटी रुपयांची उलाढाल झाली. रत्नागिरीममध्ये मे महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात आयोजित कृषी महोत्सवातून तेरा लाखाची उलाढाल झाली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:28 PM 02-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here