इंग्लंडमध्ये फलंदाजी करणे आव्हानात्मक : जडेजा

0

बर्मिंगहॅम : ‘इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यादरम्यान फलंदाजी करताना आव्हानात्मक परिस्थितीताचा सामना करावा लागतो.

त्यामुळे इंग्लंडमध्ये शानदार फलंदाजीसह शतक झळकावणे कायम विशेष ठरते. एक फलंदाज म्हणून यामुळे प्रतिष्ठा वाढते, तसेच कारकिर्दीत नवा आत्मविश्वास मिळतो,’ असे मत भारताचा स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजा याने व्यक्त केले.

जडेजाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात १९४ चेंडूंत १०४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. जडेजाने ऋषभ पंतसह (१४६) सहाव्या गड्यासाठी २२२ धावांची निर्णायक भागीदारी करत भारताला ५ बाद ९८ धावांवरून कमालीचे पुनरागमन करून दिले होते. विदेशात जडेजाने पहिल्यांदा शतकी खेळी केली. त्याने दुसऱ्या दिवसाच्या खेळानंतर सांगितले की, ‘मी खूप आनंदित आहे. मी भारताबाहेर एक शतक झळकावले आहे आणि तेही इंग्लंडमध्ये. एका क्रिकेटपटूसाठी हे खूप मोठे यश आहे. इंग्लंडमधील प्रतिकूल परिस्थितीत झळकावलेल्या या शतकामुळे माझा आत्मविश्वास उंचावण्यास मदत होईल.’

गेल्या काही वर्षांमध्ये जडेजाने आपल्या फलंदाजीमध्ये जबरदस्त सुधारणा केली आहे. त्याने म्हटले की, ‘इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना कायम शरीराच्या खूप जवळून खेळावे लागते. कारण, असे नाही केले, तर कव्हर ड्राइव्ह आणि स्क्वेअर ड्राइव्ह मारण्याच्या प्रयत्नात स्लीप किंवा यष्टिरक्षकाकडे झेल जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मी ऑफ स्टम्पबाहेर जाणाऱ्या चेंडूना सोडण्याचा पूर्ण प्रयत्न केला.’
जडेजाने पुढे सांगितले की, ‘इंग्लंडच्या परिस्थितींमध्ये चेंडू स्विंग होत असतो. त्यामुळे फलंदाजीमध्ये खूप शिस्त आणावी लागते. बाहेर जाणारे चेंडू सीमापार धाडण्याचा प्रयत्न करू नये. जर चेंडू माझ्या टप्प्यात आला, तर मात्र मी नक्कीच त्यावर हल्ला चढवतो.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here