रत्नागिरी : राष्ट्रीयीकृत बँकांनी आंबा बागायतदारांच्या कर्जावरील व्याजमाफीचे प्रस्ताव आठ दिवसांच्या आत पाठवावेत अन्यथा लीड बैंकला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा म्हाडा अध्यक्ष आ. उदय सामंत यांनी दिला आहे. राष्ट्रीयीकृत बँकांकडून प्रस्ताव वेळेवर न आल्यामुळे आंबा बागायतदारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे कर्जावरील व्याजमाफी आणि कर्जाचे पुनर्गठन प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याचे बागायतदारांचे मत आहे. यासाठी बागायतदारांनी आंदोलनही केले होते. त्याची दखल घेऊन आमदार सामंत यांनी याबाबतीत पुढाकार घेतला. कोकणातील आंबा बागायतदारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीमध्ये सहकार खात्याच्या अधिका-यांनी राष्ट्रीयीकृत बँकांकडून प्रस्तावच प्राप्त झालेले नसल्याची माहिती पुढे आली. या बैठकीला आंबा बागायतदार संघटनेचे बाबा साळवी, सुनील नावले, किरण तोडणकर, अविनाश गुरव, कृषी विभाग उपसचिव किरण पाटील, पी.एस. दुबे, कृषी विभाग जनरल सेक्रेटरी आत्माराम यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
