तवसाळ येथे ताडबियांची लागवड

0

गुहागर : गुहागर तालुक्यातील तवसाळ येथे समुद्रकिनारी ताडबियांची लागवड करण्यात आली. गुहागर तालुक्याच्या कार्यतत्पर तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या पुढाकाराने, सुप्रसिद्ध अभिनेते सयाजीराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाने आणि संपुर्ण देशभरात ताड झाडांची लागवड,त्याचे संवर्धन, संगोपन यासाठी वाहुन घेतलेले मुळ तामिळनाडू राज्याचे सुपुत्र आणि सध्या मुंबई येथे वास्तव्यास असणारे गॉडसन सॅम्युअल यांच्या सक्रिय मार्गदर्शन आणि सहभागातुन गुहागर तालुक्यामध्ये ताड बियांचे वाटप करण्यात आले.

ताडबियांच्या बरोबरीने तहसीलदार महोदया सौ प्रतिभाताई वराळे यांच्या माध्यमातुन विविध बहुउपयोगी झाडांचे वाटप आणि लागवड करण्यात आली.

गुहागर तालुका हा भौगोलिक दृष्ट्या माड आणि सुपारीच्या लागवडीसाठी उपयुक्त असल्याने प्रसिद्ध अभिनेते सयाजीराव शिंदे यांनी तहसीलदार आणि गाॅडसन सॅम्युअल यांच्या माध्यमातुन ताड झाडांच्या लागवडी करता गुहागर तालुका किनारपट्टीची निवड केली आहे. हे झाड पर्यटकांना आकर्षित करणारे असुन जमिनीची धूप थांबविण्यासाठीसुद्धा उपयुक्त आहे.त्याचबरोबर नारळाच्या झाडाप्रमाणे शेतक-याना आर्थिक सक्षम करणारे असल्याने या झाडाची लागवड अधिकाधिक होणे गरजेचे असल्याचे मत तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी व्यक्त केले आहे. याच भावनेतुन प्रेरित होऊन गुहागर तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या पुढाकाराने कातळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात तवसाळ खुर ग्रामस्थांच्या वतीने 50 ताडबियांचे रोपण करण्यात आले. यावेळी गुहागर तालुका भाजप अध्यक्ष निलेश सुर्वे, सरपंच सौ नम्रता निवाते, उपसरपंच प्रसाद सुर्वे,ग्राम विस्तार अधिकारी महेंद्र निमकर, राजेश सुर्वे, अमोल सुर्वे, किरण गडदे,मनोज कांबळे, दिपक बारस्कर, कैलास मोहिते, आदी मान्यवर व ग्रामस्थ मंडळी यावेळी उपस्थित होती.

ताड हा वृक्ष अॅरॅकेसी कुळातील असुन त्याचे शास्त्रीय नाव बोरॅसर फ्लेबेलिफर आहे. सिंधी, खजुर, माड (नारळ) ही झाडे याच कुळातील आहे.ताडाचे झाड लांबुन माडाच्या (नारळाच्या)झाडासारखेच दिसते. हे झाड मुळ इंडोनेशीयातील असुन पाकिस्तानात सुद्धा या झाडांची लागवड आढळुन येते. ताडाच्या झाडाला पिवळा रंगाची फळे लागतात. ताडापासुन ताडी हा द्रवरूप पदार्थ उपलब्ध होतो. ताडाच्या नर झाडापेक्षा मादी झाड दीडपट जास्त द्रव पदार्थ देतात. मधुमेही रुग्णांकरता हा द्रव पदार्थ फारच गुणकारी आहे. ताडीवर प्रक्रिया करून यापासुन गुळ आणि साखर तयार केली जाते. ताडाच्या पानाच्या देठापासून तंतु ,दोऱ्या तयार करतात.झोपड्या शाकारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या झावळ्या तयार करतात.ताडाच्या पानापासुन पंखे, छत्र्या, इरली, चटया, टोप्या, टोपली, लहान मुलांची खेळणी तयार केली जातात. या सर्व गोष्टीमुळे ताड झाडांची लागवड ही उपयुक्त असून आर्थिक सक्षमीकरणास करता सुद्धा महत्त्वाची आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here