कुंभार्ली घाटात दरड कोसळली

0

चिपळूण : याआधी खड्यांमुळे कुंभार्ली घाट रस्ता मृत्युचा सापळा बनला होता. मात्र आता दरडीमुळे हा मार्ग धोकादायक ठरू लागला आहे. आज, मंगळवारी दुपारी 2 वाजता या घाटात पुन्हा दरड कोसळली.

दरड किरकोळ स्वरूपाची असल्याने काही वेळातच रस्त्यावरील माती हटवून मार्ग सुरु ठेवण्यात आला.

गुहागर -विजापूर मार्गावरील हा घाट कोकण व पश्‍चिम महाराष्ट्राला जोडतो. १८ कि.मी लांबीच्या घाट रस्त्यात अनेक नागमोडी वळणे आहेत. गतवर्षीच्या पावसाळ्यात घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. मोठ्या दरडी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हटवण्यात आल्या. मात्र आता पुन्हा या घाटात दरडीचे सत्र सुरू झाले आहे.

पंधरा दिवसांपूर्वी या घाटात दरड कोसळल्यानंतर बऱ्याच वेळाने तेथे यंत्रणा पोहचली होती. या विषयावरून प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याची माहिती तहसीलदार अथवा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळालीच नाही. थेट जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात ही माहिती देण्यात आली. ही बाब गंभीर असल्याचे सुनावले होते.

त्यानुसार मंगळवारी ही दरड कोसळल्याची घटना घडताच आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती देण्यात आली. त्याप्रमाणे तातडीने जेसीबी नेऊन रस्त्यावरील माती दगड हटविण्यात आले. यानंतर या घाटातून वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:22 PM 05-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here