भाजपा प्रदेशाध्यक्षपदासाठी ‘या’ दोन नावांची चर्चा

0

मुंबई : राज्यात एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करुन भाजपा पक्षश्रेष्ठींनी सगळ्यांनाच धक्का दिला. इतकंच नाही तर सुरुवातीला मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, अशी घोषणा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनाही पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार उपमुख्यमंत्रीपदही स्वीकारावं लागलं.

भाजपात अनेक वरिष्ठ आणि अनुभवी नेतेमंडळी असतानाही विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आता मंत्रिपद वाटपातही हे धक्कातंत्र दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. तसेच मंत्रिमंडळ वाटपानंतर भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची धुराही नव्या दमाच्या नेत्याकडे जाण्याची चर्चा आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्षपदासाठी या दोन नावांची चर्चा

मुंबई भाजपाचे माजी अध्यक्ष आशिष शेलार आणि आमदार राम शिंदे या दोन नावांची प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा आहे. चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात घेऊन, शेलार किंवा शिंदे यांना प्रदेशाध्यक्षपद दिले जाऊ शकते. २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची जबाबदारी आणि पक्षविस्ताराची जबाबदारी त्यांच्याकडे येण्याची शक्यता आहे.

आशिष शेलार मुंबई भाजपातील मोठे नेतृत्व

सध्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातून आमदार असलेले आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेत अनेक वर्षे नगरसेवकपदी काम केलेले आहे. मुंबईतील पक्ष संघटना विस्तारातही त्यांचा मोठा वाटा आहे. गेल्या मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यात त्यांनी शिवसेनेच्या तोंडचे पाणी पळवले होते. त्यानंतर फडणवीस मंत्रिमंडळात शेवटच्या वर्षात त्यांना शिक्षणमंत्रीपदही देण्यात आले होते. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील भाजपाच्या यशातही त्यांचा सहभाग होता. नुकत्याच झालेल्या राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीतही भाजपाच्या धक्कादायक विजयात त्यांचा मोलाचा वाटा आहे. अशा स्थितीत त्यांना शिंदे मंत्रिमंडळात अडीच वर्ष कॅबिनेट मंत्रिपद देण्यापेक्षा त्यांना प्रदेशाध्यक्षपदाची संधी देऊन त्यांच्याकडून प्रदेश भाजपाचे संघटन अधिक बळकट केले जाण्याची शक्यता आहे. तसेच भाजपातील प्रभावी मराठा नेतृत्व असाही त्यांचा दरारा आगामी काळात प्रदेश स्तरावर निर्माण होण्याची शक्यता आहे.

राम शिंदे यांनाही मोठ्या संधीची शक्यता

नगरच्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील राम शिंदे हे देवेंद्र फडणवीसांच्या २०१४ च्या मंत्रिमंडळात होते. गृह, पणन, आरोग्य, पर्यटन अशी राज्यमंत्री म्हणून आणि नंतर ओबीसी, राजशिष्ठाचार, पणन-वस्त्रोद्योग, मृदू जलसंघारण अशा चार खात्यांची कॅबिनेटची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती. २०१९ रोहित पवारांकडून पराभूत झाल्यानंतर, त्यांना नुकतीच विधान परिषदेवर संधी देण्यात आली आहे. सालगडी ते प्राध्यापक ते मंत्री असा त्यांचा प्रवास राहिलेला आहे. ओबीसी चेहरा म्हणून त्यांना आगामी काळात राज्यात बळ देण्याची शक्यता नाकारता येत नाही.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
3:04 PM 06-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here