कालिदासाचे काव्य जनसामान्यांनाही आपलेसे वाटते : प्रो. नंदा पुरी

0

रत्नागिरी : कालिदासाचे काव्य जनसामान्यांनाही आपलेसे वाटते, असे प्रतिपादन प्रो. नंदा पुरी यांनी येथे केले.

कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्रातर्फे ‘कालिदासकृतींमधील काव्यसौंदर्य’ या विषयावर ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. रघुवंश, कुमारसंभव, मेघदूत, ऋतुसंहार या काव्यांबरोबरच अभिज्ञानशाकुंतल, मालविकाग्निमित्र, विक्रमोर्वशीयसारख्या नाटकांचाही विचार करत एकूणच कालिदासाच्या प्रसिद्ध सप्तकृतींतील निवडक श्लोकांचे दाखले प्रो. पुरी यांनी दिले. प्रसंगी अभ्यासपूर्ण संदर्भांची जोड देत प्रत्येक कृतीचे काव्यात्मक सौंदर्य आपल्या ओघवत्या वाणीने त्यांनी व्यक्त केले.

कालिदासाची प्रत्येक कृती शृंगार रसाने व्यापृत असून कालिदासासारखा अजरामर कवी आपल्या कल्पनांच्या आधारे गगन भराऱ्या मारताना दिसत असला तरी त्याने वास्तवाचे भान कोणत्याही प्रसंगी सोडलेले दिसत नाही. तो आपले पाय जमिनीवर घट्ट रोवून स्थिर असल्याचे दिसते. कालिदासाच्या काव्यात नाट्य आणि नाट्यात काव्याचे दर्शन होते. शब्दचित्र रेखाटण्यात कालिदास अव्वल ठरला आहे, असे प्रो. पुरी यांनी सांगितले.

प्रो. कृष्णकुमार पाण्डेय यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले. कालिदासाच्या कलाकृती पूर्वीच्या काळी जितक्या प्रासंगिक होत्या, तितक्याच त्या सद्यःस्थितीतही प्रासंगिक असून भविष्यातही त्याची प्रासंगिकता अधिक वाढेल, असे प्रतिपादन प्रो. पाण्डेय यांनी अध्यक्षीय भाषणात केले. रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी प्रास्ताविक केले तर आशीष आठवले यांनी सूत्रसंचालन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here