कोल्हापुरात पावसाची उसंत, पंचगंगेच्या पाणी पातळीत घट

0

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसाला ब्रेक लागला. आज, शुक्रवार सकाळपासून अधून-मधून सरी बरसत असल्या तरी पावसाचा जोर कमी झाला आहे. यामुळे पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी ३१ फूट ३ इंच इतकी झाली आहे.

इशारा पातळीकडे जाणारे पाणी कमी होत आहे. परिणामी पूरबाधित क्षेत्रातील कुटुंबांना दिलासा मिळाला. मात्र तळकोकण आणि धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने २७ बंधारे पाण्याखाली आहेत. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे.

काल, गुरुवार आणि आज पावसाचा जोर कमी राहिला. दिवसभर आकाश ढगांनी भरून राहिले. राहून राहून पावसाच्या बारीक सरी कोसळत होत्या. मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री पंचगंगा नदी पातळी ३२.५ वर पोहचली. इशारा पातळी ३९ असल्याने त्या दिशेने पाणी वाढत होते. पण काल, गुरुवारी सकाळपासूनच पाऊस कमी झाला. यामुळे स्थलांतरित होण्याची तयारी करणाऱ्या कुटुंबांनीही सुटकेचा निश्वास सोडला.

गाफील राहू नका…

पंचगंगा पाणी पातळी कमी होत असल्याने शहरातील अनेक जण कुटुंबासह पंचगंगा घाटावर पाणी पाहण्यासाठी आले होते. पाणी पाहण्यासाठी आलेल्या काहींना नदीसह सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही.

राधानगरी धरण

राधानगरी धरणात १०० दशलक्ष घनमीटर पाणी साठा झाला आहे. धरणातून १२०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण चांगले राहिले. यामुळे पाणी पातळीत वाढ होत आहे.

२७ बंधारे पाण्याखाली

पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वाळोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, वेधगंगा नदीवरील कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर, धामणी नदीवरील सुळे व अंबार्डे, दूधगंगा नदीवरील- दत्तवाड, तुळशी नदीवरील- बीड व वारणा नदीवरील- चिंचोली असे बंधारे पाण्याखाली आहेत.

धरणसाठा असा (पाणीसाठा दलघमीमध्ये)

तुळशी : ४३.७४, वारणा : ३८४.४४, दूधगंगा : २३८.६७८, कासारी :३७, दलघमी, कडवी : २८.५, कुंभी : ३६.५६, पाटगाव : ४५.४, चिकोत्रा : २०.२५, चित्री : १९.४९, जंगमहट्टी : १५.१०, घटप्रभा: ४४.१७, जांबरे : १२.५१, आंबेआहोळ : १९.९५.

तालुकानिहाय पाऊस

गुरुवारी सकाळी आठपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय असा : हातकणंगले: ७, शिरोळ : ४.१, पन्हाळा : २८.८, शाहूवाडी : २४.६, राधानगरी : ३५.१, गगनबावडा : ८०.६, करवीर :१५.२, कागल :१८, गडहिंग्लज : १९.१, भुदरगड : ४४.३, आजरा : ४२.५, चंदगड : ३२.३.

अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान खात्याने आज, शुक्रवारीही अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामुळे सर्व शासकीय यंत्रणा सतर्क आहेत. आपत्कालीन परिस्थितीत निर्माण झाल्यास ०२३१-२६५९२३२, ०२३१-२६५२९५०, ०२३१-२६५२९५३, ०२३१-२६५२९५४ या दूरध्वनी क्रमांकावर आणि १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
2:19 PM 08-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here