चिपळूणला सलग तिसऱ्या दिवशी पुराच्या पाण्याचा वेढा राहिला आहे. चिपळूण बाजारपेठेसह खेर्डी परिसरात पूर भरला असून येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने बहादुरशेख पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. यामुळे मुंबई- गोवा महामार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. चिपळूनातील नागरिकांना तब्बल आठवेळा पुराचा सामना करावा लागला आहे. जून महिन्यात पाऊस उशिरा सुरू झाला. मात्र, नंतर पावसाने जो वेग घेतला आहे, तो आतापर्यंत कायम आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आतापर्यंत विक्रमी पाऊस पडला आहे. गेल्या दहा- बारा दिवसात पाऊस जोरदारपणे पडला. यामुळे वाशिष्ठी, शिवनदी धोक्याची पातळी ओलांडत असल्याने चिपळूण बाजारपेठेत हळूहळू पाणी शिरण्यास सुरुवात होते. जुना बस स्थानक, चिंचनाका, अनंत आईस फेक्ट्री, वडनाका, वेस मारुती मंदिर, बहादूरशेख नाका, तर जुना बाजारपूल परिसर तसेच खेर्डी परिसरात पाणी साचते. ही परिस्थिती गेली काही दिवस सुरू आहे. चिपळुनात तब्बल आठवेळा पाणी भरले आहे. तर आता सलग तीन दिवस चिपळूणला पुराचा वेढा बसला आहे. पुराचे पाणी चिपळूण व खेर्डी बाजारपेठेतील दुकानात शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच आर्थिक उलाढाल ठप्प झाली आहे. आज मंगळवारी तिसऱ्या दिवशी पुराचे पाणी कायम राहिल्याने चिपळूण तिसऱ्या दिवशी ठप्प झाले आहे. तर ग्रामीण भागात पडझडीच्या मोठ्या घटना घडल्या आहेत. यामुळे ग्रामीणवासीय देखील हैराण झाले आहेत.
