चिपळूणमध्येही रिक्षा व्यावसायिकाला गुंगीचे औषध देऊन लुटले

0

रत्नागिरी : प्रसादाच्या पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन एका रिक्षा व्यावसायिकाला प्रवाशांनी लुटल्याचा धक्कादायक प्रकार चिपळूण तालुक्यात घडला. रत्नागिरी नंतर आता लुटण्याचे हा प्रकार चिपळूण पर्यंत पोहोचला आहे. त्यात रत्नागिरीतील घटनेतील संशयित पोलिसांच्या ताब्यात असताना चिपळूण मध्ये हा प्रकार घडला आहे.

चिपळूणमध्ये अज्ञात चोरट्यांनी रिक्षा व्यावसायिकाच्या रिक्षा व्यावसायिकाच्या गळ्यातील दोन तोळे चेन व ८०० रुपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. चिपळूण तालुक्यातील कामथे येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयात सध्या या रिक्षा व्यावसायिकावर उपचार सुरू असून चिपळूण पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

राकेश रविंद्र सकपाळ (रा. वेहेळ, ता. चिपळूण) असे या रिक्षा व्यावसायिकाचे नाव आहे. राकेश सकपाळ यांनी शनिवारी शहरातील बहाद्दूरशेख नाका येथील रिक्षा स्टॉपला आपली रिक्षा उभी केली होती. दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास दोन प्रवासी तेथे आले. ते हिंदी भाषेत बोलत होते. त्यांनी आपल्याला टेरव येथील मंदिरात जायचे असल्याचे सांगितले. त्यानुसार त्या दोन प्रवाशांना रिक्षात बसवून श्री. सकपाळ यांनी कामथेमार्गे टेरव येथे नेले. तेथील देवस्थानचे दर्शन झाल्यानंतर खेर्डीमार्गे दादर येथील मंदिरात पोचले. तेथून परतत असताना त्यांनी राकेश सकपाळ यांना प्रसादाचा पेढा दिला. त्या दोघांनीही दुसरी मिठाई स्वतः खाल्ली.

काही अंतरावर गेल्यानंतर राकेश याच्या डोळ्यावर अंधारी येवू लागली. तेवढ्यात ते दोघे प्रवासी लघुशंकेकरिता खाली उतरले. त्यानंतर मात्र काय घडले हे राकेश सकपाळ यांनाही सांगता येईना. ते बेशुद्धावस्थेत रिक्षात पडून होते. मात्र रात्र झाली तरी राकेश घरी न परतल्यामुळे त्यांच्या भावाने शोधाशोध केली. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास खेर्डी येथे त्यांची उभी असलेली रिक्षा दिसली. त्या रिक्षाच्या मागील सीटवर ते झोपलेल्या अवस्थेत दिसले. त्यांच्या डोळ्यावर धुंदी होती. धड बोलताही येत नव्हते. या प्रकाराने राकेश यांचे नातेवाईक घाबरले. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.

पोलिसही तत्काळ घटनास्थळी पोचले. त्यानंतर त्यांना कामथे येथील शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शुद्धीवर आल्यानंतर त्यांनी पोलिसांना व नातेवाईकांना आठवते तेवढी हकीकत सांगितली. गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चेन व खिशातील आठशे रूपये चोरीला गेल्याचे सांगितले. त्यांचा जबाब घेतल्यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरू केला आहे.

रत्नागिरीत दोन रिक्षाचालकांबाबत एकाच दिवशी असा प्रकार घडला हाेता व त्या प्रकरणात पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
6:16 PM 11-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here