औरंगजेब तुमचा नातेवाईक कसा काय झाला?; संजय राऊतांचा शिंदे सरकारला टोला

0

नागपूर : ठाकरे सरकारने औरंगाबादचं संभाजीनगर केलं, उस्मानाबादचं धाराशिव केलं. नवी मुंबई विमानतळाला दि. बा पाटील यांचे नाव दिलंय, हे निर्णय रद्द केले हे खरं असेल तर हे सरकार हिंदुत्व द्रोही, महाराष्ट्र द्रोही आहे हे सिद्ध झालंय.

औरंगाबादचं संभाजीनगर कधी करता यासाठी भाजपा विचारत होती. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भुमिकेतून हे निर्णय घेतले होते, या निर्णयाला स्थगिती दिली असेल तर यांच्यासारखे ढोंगी लोक नाही अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

संजय राऊत म्हणाले की, हे निर्णय बदलून काय साध्य केलं हे फडणवीस यांना विचारायला हवं, मुख्यमंत्री शिंदेंना विचारा म्हणणार नाही. कारण त्यांच्या हातात काहीही नाही. एकाबाजूला तुम्ही शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं असा आक्रोश करता, तर दुसऱ्या बाजूला हा निर्णय बदलला. औरंगजेब आता तुमचा कसा काय नातेवाईक झालाय? हा उस्मान कोण लागतोय तुमचा? हे सरकार गोंधळलेय, या सरकारवर सर्वोच्च न्यायालयाची टांगती तलवार आहे त्यामुळे त्यांचा मेंदू बधीर झालाय असा घणाघात त्यांनी केला.

त्याचसोबत संसदेत यापुढे काहीही करता येणार नाही, हात पाय बांधून तोंडावर चिकट पट्ट्या बांधून आम्हाला जावं लागणार आहे. यादेशात आणीबाणी पेक्षा जास्त भयानक स्थिती आहे आणीबाणी सहभागी असलेल्यांना पेन्शन देण्याचा निर्णय कशाला घेतलाय. आम्ही आणीबाणी विरोधात लढतोय. त्यामुळे सर्व महाराष्ट्राला पेन्शन द्यावी लागेल. चिठ्या देतात, माईक खेचतात, शर्ट खेचतात बऱ्याच गंमती जमती राज्यात पाहायला मिळतेय. यावर मी काय बोलणार. खरे मुख्यमंत्री काय बोलणार असा टोला राऊतांनी लगावला.

राज्यपालांनी घटना समुद्रात बुडवली का?
मुळात हे सरकार बेकायदेशीर आहे, त्यांना निर्णय फिरवण्याचा अधिकार नाही. वेळ जात नसेल तर राज्यपाल लाटा मोजतात काय? राज्यात घटनाबाह्य काम करत आहे, आमच्या सरकारमध्ये त्यांचे लक्ष असायचे. मग आता राज्यपालांची घटना समुद्रात बुडवली का? अशी टीका संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 AM 15-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here