शिवसेना सोडून गेलेल्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा, शिवसेनेच्या नावाने माधुकरी मागू नका : संजय राऊत

0

मुंबई : शिवसेना सोडून गेलेल्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा, शिवसेनेच्या नावावर माधुकरी मागून जगू नका, अशा शब्दांत शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोरांवर हल्लाबोल केला आहे.

शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचीच आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेच्या नावाचा गैरवापर करू नका असेही राऊत यांनी म्हटले.

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी बंडखोरांवर नाराजी व्यक्त करताना तीव्र शब्दात टीका केली. बेईमानी करणारी व्यक्ती शेवटपर्यंत बेईमान नसल्याचे सांगतो. त्याच प्रमाणे शिवसेना सोडली नसल्याचे, शिवसेनेतच असल्याचे सांगितले जात असल्याचे जात आहे. त्यांनी स्वतंत्र पक्ष स्थापन करावा, शिवसेनेच्या नावावर कशाला जगताय असा प्रश्न संजय राऊत यांनी केला.

आपल्यासोबत आलेल्या एकाही आमदाराचा पराभव झाल्यास राजकारण सोडून देईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले होते. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना संजय राऊत यांनी म्हटले की, बंडखोरांच्या नेत्यांना अशी वक्तव्ये करावी लागतात. मात्र, ज्यांनी शिवसेना फोडली, त्यातील अनेकजण बरीच वर्ष राजकारणातून बाहेर होते अशी आठवणही राऊत यांनी करून दिली. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात काय सुरू आहे, याचा अंदाज आम्हाला असल्याचेही त्यांनी म्हटले. शिवसेनेने हकालपट्टी केलेल्यांपैकी काहीजण भाजपसोबत युती असतानाही पराभूत झाले आहेत, असेही राऊतांनी सांगितले.

राज्यात सध्या असणारे सरकार हे बेकायदा सरकार असल्याचा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला. सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आणि एक उपमुख्यमंत्री आहेत. हे म्हणजे ‘एक दुजे के लिए’ चित्रपटासारखं आहे. या चित्रपटाचा अंत काय झालाय हे सगळ्यांना माहीत आहे. यांचाही राजकीय अंतही तसाच होईल, असा इशारा राऊत यांनी दिला.

केंद्र सरकारकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न
देशातल्या संसदेत प्रखर बोलण्यावर बंदी घातली गेली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. प्रखर बोलण्यासाठी आवश्यक असणाऱ्या शब्दांवर बंदी घातली गेली आहे. ही बंदी लोकशाहीविरोधात असल्याचे त्यांनी सांगितले. संसदेच्या आवारात निर्दशने करण्यास बंदी घातली गेली आहे. अशा प्रकारची बंदी म्हणजे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न आहे. या देशात लोकशाही आहे का असा प्रश्न जगाला पडेल असेही राऊत यांनी म्हटले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 AM 16-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here