पंचगंगेच्या पाणी पातळीत घट

0

कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. अधून-मधून रिमझिम सरी बरसत असल्यातरी पावसाने उघडीप घेतली आहे.

त्यामुळे पंचगंगेच्या पाणी पातळीत घट होत आहे. सध्या पंचगंगेची पाणी पातळी ३२ फूट ९ इंच इतकी असून ३३ बंधारे पाण्याखाली आहेत. त्यामुळे कोल्हापूरकरांना पूरपरिस्थितीपासून मोठा दिलासा मिळाला.

पाऊस कमी झाला असला तरी अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडत आहेत. मागील चोवीस तासात जिल्ह्यात ३७ इमारतींची पडझड होऊन साडेदहा लाखांचे नुकसान झाले आहे. पाऊस कमी झाल्याने नद्यांंची पातळी कमी होत असून, पंचगंगेची पातळी काल, सोमवारी एका दिवसात तब्बल अडीच फुटाने कमी झाली आहे. दिवसभरात १५ बंधारे मोकळे झाले आहेत.

पावसाने उघडीप दिली असली तरी दिवसातून अनेक वेळा जोरदार सरी कोसळत आहेत. हा पाऊस पिकांना पोषक असून, गेली आठ-दहा दिवस पावसाने गारठलेल्या पिकांना हे वातावरण चांगले ठरत आहे. धरण क्षेत्रातही पाऊस कमी झाल्याने पाणीसाठा संथ गतीनेच वाढत आहे. राधानगरी व वारणा धरण ७३ टक्के भरले आहे. दुधगंगा अद्याप ६२ टक्क्यांवरच आहे. राधानगरीतून प्रतिसेकंद १४००, वारणातून १८५८ तर दुधगंगेतून ११०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. अलमट्टीतून प्रतिसेकंद १ लाख २६ हजार घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र, धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांची पातळी संथगतीने कमी होत आहे.

पाऊस थांबला असला तरी जिल्ह्यात पडझडीच्या घटना कायम आहेत. एका सार्वजनिक मालमत्तेची पडझड होऊन ५० हजार तर ३६ खासगी मालमत्तांच्या पडझडीत १० लाख असे १० लाख ५० हजारांचे नुकसान झाले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:29 PM 19-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here