रायगड : एकीकडे कोरोना विषाणूची राष्ट्रीय आपत्ती आली असताना ती हद्दपार करण्यासाठी शासन, प्रशासन, आरोग्य यंत्रणा, डॉक्टर, कर्मचारी अहोरात्र काम करीत आहे. असे असताना रायगड जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन डॉक्टर आपले कर्तव्य विसरून कोरोनाविरोधात सुरू असलेल्या युद्धातून पलायन केले आहे. या डॉक्टरांच्या या उचललेल्या पावलाने त्यांनी आपल्या डॉक्टरी पेशाला काळिमा फासला आहे. डॉ. आरसरे आणि डॉ हिवरे अशी दोघांची नावे असून त्यांनी आपले राजीनामा रुग्णालय प्रशासनाकडे सुपूर्द केले आहेत. जगभरात सध्या कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशासह राज्यातही कोरोनाचे बाधित आढळले असून रायगडात सध्या एक कोरोना बाधित आहे. असे असूनही जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा ही कोरोना विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये म्हणून अहोरात्र मेहनत घेत आहेत. जिल्ह्यात अलिबाग, पनवेल, पेण, माणगाव, महाड याठिकाणी कोरोना बाधितांसाठी विलगिकरण, अलगिकरण कक्षाची निर्मिती केलेली आहे. या ठिकाणी डॉक्टर, परिचारिका, वार्ड बॉय याच्या ड्युटी लावण्यात आलेल्या आहेत. त्याच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारीही घेण्यात आलेली आहे. डॉ. आरसरे आणि डॉ हिवरे हे दोघेही जिल्हा सामान्य रुग्णालयात फिझिशियन वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करीत आहेत. कोरोना विषाणूच्या अनुषंगाने त्याची ड्युटी लावण्यात आलेली होती. मात्र ही ड्युटी नको म्हणून घाबरून दोघांनीही जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे आपले राजीनामे दिले आहेत. राजीनामे देण्याआधी डॉक्टर, प्रशासन अधिकारी यांनी त्याचे मन वळविण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र ते आपल्या मतावर ठाम राहिले आहेत. राष्ट्रीय आपत्ती देशात लागू असताना डॉक्टरांची संख्या आधीच रायगड जिल्ह्यात कमी आहे. त्यातच डॉ. आरसरे आणि डॉ हिवरे यांनी आपली जबाबदारी झटकून मैदानातून पळ काढला आहे. त्यामुळे अशा कठीण परिस्थितीत डॉक्टरांची गरज असताना दोघे पळ काढत असल्याने त्यांच्या विरोधात संतापाची लाट पसरली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
5:57 PM 31-Mar-20
