“सोनिया गांधींची ED चौकशी म्हणजे….” : देवेंद्र फडणवीस

0

मुंबई : नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना ईडी चौकशीसाठी आज बोलवण्यात आले.

सोनिया गांधी यांची सक्तवसुली संचालनालयाकडून सुमारे २ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना कार्यालयातून बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली. या कारवाईचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणावर निषेध करण्यात आला. पण ही कारवाई राजकीय हेतुने प्रेरित नाही असा पुनरूच्चार भाजपाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

“सोनिया गांधींची ईडी चौकशी याबद्दलची भूमिका भाजपाने वेळोवेळी स्पष्टपणे मांडलेली आहे. नॅशनल हेराल्ड केस संदर्भात ५ हजार स्वातंत्र्यसैनिकांना फसवल्याचा आणि २ हजार कोटी रूपये खासगी मालकीच्या करण्याचा आरोप केला गेला आहे. म्हणून ही चौकशी सुरू आहे. कोणाला जर कुठल्याही चौकशीला सामोरे जावं लागत असेल तर त्यात वाईट वाटून घेण्याचे काहीच कारण नाही असं मला वाटतं. ही चौकशी जर सरकारच्या पुढाकाराने सुरू झाली असती तर त्यात राजकीय षडयंत्र आहे असं म्हणता आलं असतं. पण ही चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू आहे. त्यामुळे यात राजकीय हस्तक्षेप नाही. ही चौकशी म्हणजे न्यायालयाच्या आदेशाची पूर्तता आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

राहुल गांधींची संतप्त प्रतिक्रिया

दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडी चौकशीसाठी आज बोलवण्यात आले होते. या आधी याच प्रकरणात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची तब्बल पाच दिवस ईडी चौकशी करण्यात आली होती. आजही सोनिया गांधी यांना चौकशीला बोलावल्यानंतर राहुल गांधी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. “देशातील जनतेचा आवाज जाहीरपणे दाबला जातोय. अहंकार आणि हुकूमशाहीवर सत्याचा नक्कीच विजय होईल. जीएसटी, महागाई, अग्निपथ, एजन्सींचा गैरवापर यावर चर्चा करायचं असल्यास सभागृह तहकूब केलं जातं. पण एक दिवस अहंकारावर सत्याचा नक्कीच विजय होईल”, अशा शब्दांत राहुल गांधींनी प्रतिक्रिया दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:59 PM 21-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here