आदित्य ठाकरे आणि शिंदे गटाचे सुहास कांदे येणार आमने-सामने..

0

नाशिक : शिवसेना आमदार आणि माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात बंडखोर आमदार सुहास कांदे निवेदन देणार आहेत.

सुहास कांदे शिंदे गटात सामील झाले आहेत. मनमाडमध्ये आदित्य ठाकरे यांचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात सुहास कांदे चार ते पाच हजार कार्यकर्ते घेऊन मनमाडला जाणार आहेत. याबाबत मनमाडमध्ये होर्डिंग देखील लावले आहेत. ‘माझं काय चुकलं’ या आशयाखाली मतदारसंघातील कामांची यादी आणि हिंदुत्व या विषयावरुन शिवसेना कशी दूर गेली याचा उल्लेख या निवेदनात असणार आहे.

महाराष्ट्रातील सत्तासंघार्षानंतर आदित्य ठाकरे ठिकठिकाणी जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधत आहेत. यासाठी त्यांची शिव संवाद यात्रेला सुरुवात झाली आहे. 21 ते 23 जुलै असा या यात्रेचा कालावधी असून ही यात्रा भिवंडी, नाशिक, दिंडोरी, संभाजीनगर आणि शिर्डी अशी असणार आहे. काल ही यात्रा भिवंडीत होती. त्यानंतर इगतपुरी आणि नाशिक इथे मेळावा झाला. आज मनमाड इथे त्यांचा मेळावा होणार आहे.

परंतु आदित्य ठाकरे यांच्या या मेळाव्याआधी बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी काही प्रश्न विचारले आहेत. पालघर साधू हत्याकांड, मालवण येथील हिंदूंचं पलायन, स्वातंत्र्यवीर सावरकर या हिंदुत्वाच्या मुद्द्यापसून शिवसेना दूर गेली, यावर ‘माझं काय चुकलं’ असं म्हणत सुहास कांदे यांनी सवाल उपस्थित केले आहेत. त्यांच्या या निवेदनात छगन भुजबळ, नवाब मलिक यांच्यासोबत युती केल्याचीही खंत व्यक्त करण्यात आली आहे. हे निवेदन आदित्य ठाकरे यांना देण्याआधीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल करत कांदे यांनी आदित्य ठाकरे यांना अनेक सवाल विचारले आहेत. आदित्य ठाकरे यांना या सगळ्या प्रश्नांचे निवेदन देण्यासाठी सुहास कांदे चार ते पाच हजार कार्यकर्ते घेऊन जाणार आहेत. सुहास कांदे यांच्या या भूमिकेमुळे आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सुहास कांदेच ‘माझं काय चुकलं’

शिवसेनेतील मोठ्या फुटीनंतर बंडखोरांच्या मतदारसंघात शिवसंवाद यात्रा करणाऱ्या आदित्य ठाकरे यांना आज थेट बंडखोर आमदारांचाच सामना करावा लागण्याची चिन्हं आहेत. कारण आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा आज मनमाडचे शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघात आहे. आणि कांदे यांनी या दौऱ्यात चार ते पाच हजार कार्यकर्त्यांना घेऊन आदित्य ठाकरे यांना भेटणार असल्याचं जाहीर केलंय. माझं काय चुकलं अशा आशयाचं निवेदन घेऊन कांदे आदित्य ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे आणि बंडखोर आमदार आमनेसामने येण्याची चिन्हं आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 22-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here