आठ दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी भुस्खलनाच्या घटना घडत आहेत. रत्नागिरीतील पानवल डोंगरही खचला आहे. धरणाशेजारी असलेल्या डोंगराचे मोठ्या प्रमाणावर भुस्खलन झाले आहे. या भुस्खलनात पानवल धरणातुन रत्नागिरीकडे येणारी पाईपलाईन आणि रस्ता उध्वस्त झाला आहे. पाईपलाईन गाडली गेल्याने पानवल धरणातुन शहराला होणारा पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. यामुळे निम्म्या शहरात कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू आहे.
मागील आठवडाभर संपूर्ण जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. मुसळधार पावसाने जिल्ह्यातील नद्यानाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांना पूरस्थिती आहे. अनेक बाजारपेठा तीन ते चार दिवस पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात जीथे तीथे पाणीच पाणी अशी परिस्थती आहे. मुसळधार पावसासोबत जिल्ह्यात रस्ते आणि डोंगर खचण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यातील पानवल धरणानजिकचा डोंगर खचण्याचा प्रकार समोर आला आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पानवल धरणापासून अवघ्या एक कि. मी. अंतरावर मोठ्या प्रमाणावर भुस्खलन झाले आहे. सोमवारी रात्रीच्या सुमारास हे भुस्खलन झाल्याची माहिती येथील स्थानिक ग्रामस्थांनी दिली. डोंगराच्या पायथ्याजवळचा मोठा भाग पानवल धरणाच्या वाहून जाणाऱ्या पाण्यात कोसळला आहे. भुस्खलन झालेली माती पानवल धरणातुन शहराकडे येणाऱ्या पाईपलाईनवर पडल्याने तीस फुटापर्यंतची चौदा मीटर व्यासाची पाईपलाईन मातीखाली गाडली गेली आहे. तसेच आंब्याची झाडेदेखील भुस्खलनात बाधित झाली आहेत. पानवल धरणातुन जाणारा रस्ता या भुस्खलनासह वाहुन गेला आहे. यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
पानवल धरणातुन ग्रॅव्हीटीद्वारे शहराला पाणी पुरवठा होतो. परंतु, पानवल धरणातुन शहराकडे येणारी पाईपलाईनच या भुस्खलनात मातीखाली गेली आहे. तब्बल ३० फुट पाईपलाईन मातीखाली गेल्याने मंगळवारी रत्नागिरी शहराला पानवल धरणातुन होणारा पाणी पुरवठा ठप्प झाला आहे. पानवल धरणातुन पाणी पुरवठा ठप्प झाल्याने शीळ धरणातुन तात्पुरत्या स्वरूपात पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. मातीखाली गेलेली पाईपलाईन पुन्हा बाहेर काढणे शक्य नसल्याने या ठिकाणी नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम नगर परिषदेकडून हाती घेण्यात आले आहे. तसेच खचलेल्या रस्त्याच्या ठिकाणीदेखील भराव टाकण्याचे काम सुरू होते. परंतु, मुसळधार पावसाने भराव टाकण्याच्या कामात अडथळे येत होते. पाईपलाईन उध्वस्त झाल्याने पुढील चार दिवस पानवल धरणात होणारा पाणी पुरवठा ठप्प राहणार असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
