ऋषी सुनक यांचे ब्रिटनचे पंतप्रधान स्वप्न भंगणार..?

0

भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत, पण आता त्यांच्यासाठी पुढचा रस्ता आणखी कठीण होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, असेही बोलले जात आहे की, ऋषी सुनक यांचे पंतप्रधान बनण्याचे स्वप्न भंग होऊ शकते आणि लिज ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधान होऊ शकतात.

बोरिस जॉन्सन सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेल्या सुनक यांना आता टोरी सदस्यांमध्ये खूप कठीण मतदान प्रक्रियेचा सामना करावा लागणार आहे.

इतक्या मतांची आवश्यकता
पंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी सुनक यांना आता अंदाजे 160,000 कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या मतदारांना आपल्या बाजूने पोस्टल मतपत्र देण्यासाठी तयार करावे लागेल. पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत सुनक आणि ट्रस हे दोनच दावेदार उरले आहेत. सोमवारी बीबीसीवर दोघांमध्ये थेट चर्चा होणार आहे. या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यानंतर पोस्टल बॅलेटवर मतदान होईल आणि 5 सप्टेंबरला ब्रिटनचा पुढचा पंतप्रधान कोण होणार हे कळेल.

रशिया-युक्रेन युद्धावर स्पष्ट मत
पुराणमतवादी मतदार आणि इतर राजकारण्यांमध्ये लिज ट्रस यांची लोकप्रियता प्रचंड आहे. रशिया-युक्रेन युद्धाबाबतही त्यांची भूमिका स्पष्ट आणि ठाम राहिली आहे. परराष्ट्र सचिव म्हणून व्लादिमीर पुतिन यांना युद्धासाठी जबाबदार धरण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळेच त्यांची प्रतिमा लोकांमध्ये आणखी मजबूत झाली आहे.

बोरिस जॉन्सन यांचे आवाहन
दुसरीकडे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सुनकऐवजी कुणालाही साथ द्या असे आवाहन केले आहे. जॉन्सन सरकारच्या पहिल्या दोन वर्षांत ट्रस आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव होत्या. त्यांनी ब्रेक्झिटला पाठिंबा दिला, तसेच गेल्या वर्षी त्यांना युरोपियन युनियनशी चर्चेसाठी देशाचे मुख्य वार्ताकार म्हणून नियुक्त केले गेले. ट्रस पार्टी सदस्यांच्या निवडणुकीत नेहमीच आघाडीवर राहिल्या आहेत.

अंतिम लढत रंगणार
ऋषी सुनक हे कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य आहेत. नॉर्थ यॉर्कशायरमधील रिचमंड (यॉर्क) मतदारसंघातून 2015 मध्ये खासदार झाले. 2019-2020 दरम्यान त्यांनी मुख्य कोषागार सचिव म्हणून काम पाहिले. त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये ते ब्रिटनचे अर्थमंत्री झाले. आता ऋषी सुनक पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अंतिम टप्प्यात आले आहेत. पण, येथे त्यांना परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांचा सामना करावा लागणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
4:43 PM 22-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here