‘पुरावे कसले मागता..?’ निवडणूक आयोगाने शिवसेनेला आदेश देताच संजय राऊतांचा संताप

0

मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने खरी शिवसेना कोणाची याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला पुराव्यांची कागदपत्रं सादर करण्याचे आदेश दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या या कृतीवर शिवसेना खासदार संजय राऊत काहीसे संतापले आहेत. शिवसेना आमची आहे, याचे पुरावे कसले मागता?, अशा शब्दांत संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला अप्रत्यक्षपणे फटकारले आहे. ते शनिवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी संजय राऊत यांनी म्हटले की, निवडणूक आयोग पुरावे कसले मागते? महाराष्ट्रातील ११ कोटी जनता हाच शिवसेना आमची असल्याचा पुरावा आहे. सीमाप्रश्नाच्या आंदोलनातील हुतात्मे हा पुरावा आहे. राज्यातील शिवसैनिक हाच आमचा पुरावा आहे. विधानसभा अध्यक्षांनी फुटीर गटाला २४ तासांत शिवसेना म्हणून मान्यता दिली. लोकशाहीचा खून असताना कोणते पुरावे द्यायचे, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

आज तुम्ही घोड्यावर बसले आहात, उद्या लोक तुमची गाढवावरून धिंड काढल्यावाचून राहणार नाही. हे माझे शब्द लक्षात ठेवा. फुटीरांनी खरी शिवसेना कोणाची, हे सिद्ध करून दाखवण्याची वेळ आणली हे दुर्दैव आहे. आपण फुटीर आहात, नव्या संसारात सुखी राहा. पण दिल्लीश्वरांना बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवायची आहे. त्यासाठी फुटीरांना हत्यार म्हणून वापरले जात आहे. आम्ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत आहोत. आज आमच्यावर पुरावे सादर करण्याची वेळ आणताय. फुटीरांना या पापाची परतफेड करावी लागेल. ज्यांनी शिवसेनेवर पुरावे सादर करण्याची वेळ आणली, त्यांना आई जगदंबा माफ करणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला. पैशाने आणि दहशतीने फोडलेली लोकं हा पुरावा होऊ शकत नाही, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

केंद्रीय निवडणूक आयोगाने नेमका काय आदेश दिला?

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील दोन्ही गटांना कागदोपत्री पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. आयोगाने ८ ऑगस्टला दुपारी १ वाजेपर्यंत आपलं म्हणणं मांडण्याची मुदत दोन्ही गटांना दिली आहे. त्यानंतर निवडणूक आयोग या प्रकरणी सुनावणी करणार असल्याचे समजते. निवडणूक आयोगाचा कौल काय असणार, यावर उद्धव ठाकरे यांचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाच्या बाजूने निकाल दिल्यास उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह गमवावे लागू शकते. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील ठाकरेंचे भवितव्य अस्थिर होऊ शकते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 23-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here