रत्नागिरी जिल्हा परिषदेचा कारभार चालवताना तारेवरची कसरत; अधिकारी, कर्मचाऱ्यांची 2 हजार 833 पदं रिक्त

0

रत्नागिरी : मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या जिल्हा परिषदेचा कारभार चालवताना अधिकारी, कर्मचार्‍यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. वर्ग १ पासून ते वर्ग ४ पर्यंतची २ हजार ८३३ पदे रिक्त आहेत. त्यातील वर्ग ३ ची पदे सर्वाधिक असल्यामुळे सगळीकडेच प्रभारींचे राज्य आहे. त्यातही पशुसंवर्धन, शिक्षण विभागातील अधिकार्‍यांची पदे रिक्त आहेत.

ग्राम विकासाठीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्रिस्तरीय रचना करण्यात आली आहे. गावस्तरावर ग्रामपंचायत, तालुकास्तरावर पंचायत समिती आणि जिल्हास्तरावर जिल्हा परिषद कामकाज चालते. राज्य शासनाची जी विविध खाती आहेत, त्याप्रमाणेच जिल्हा परिषदेचे कामकाज चालवले जाते. विविध विकास कामांची मान्यता देणे, पाहणी करणे, त्याची बिले काढणे ही कामे केली जातात. पशुसंवर्धन, कृषी विभागाकडून शेतकर्‍यांसाठी योजना राबविल्या जातात. पाणी पुरवठा विभागामार्फत नवीन नळपाणी योजना राबवणे, त्यांची देखभाल दुरुस्ती करणे ही कामे करतात. अधिकारी, कर्मचार्‍यांची पदे रिक्त राहिल्यामुळे अनेक पदांवर प्रभारी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्याचा प्रभाव विकासकामांवर होत आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये राज्य शासनाकडून नव्याने भरती न केल्यामुळे सेवानिवृत्त, जिल्हा बदलीने परजिल्ह्यात गेल्यामुळे वर्ग १ ते वर्ग ४ ची शेकडो पदे रिक्त आहेत. काही विभागात अधिकारी तर काही ठिकाणी कर्मचार्‍यांचा तुटवडा आहे. वर्ग ४ ची २४ टक्के पदे कपात करण्याचे आदेश आल्यामुळे परिचरसह अन्य काही पदांची एकुण पदांची पदे कमी करावी लागली आहेत.

जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये ११ हजार ७८४ पदे मंजूर आहेत. त्यामध्ये आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा, शिक्षण, महिला व बालकल्याण यांचा समावेश आहे. नवीन नियुक्त्या बदं झाल्यामुळे जिल्ह्यात २ हजार ८३३ पदे रिक्त असून त्यात वर्ग १ ची ३७, वर्ग २ ची ७२, वर्ग ३ ची २३६२ तर वर्ग ४ ची ३६२ पदांचा समावेश आहे. शिक्षण विभागात उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकारी यांची संख्या कमी आहे. या विभागाचा कारभार चालवणे अशक्य झाले आहे. साडेसहा हजार शिक्षकांसह एक लाख विद्यार्थी यांचा भार उपलब्ध अधिकारी, कर्मचारी वर्गावर आहे. तरीही शिक्षक बदल्यांची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करण्यात शिक्षण विभाग राज्यात अव्वल आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:11 AM 23-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here