मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचनेनुसार परशुराम घाटात बसविले कॅमेरे

0

रत्नागिरी : काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. या दरडींमुळे वाहतूक बंद ठेवण्याची वेळ येते. चौपदरीकरणामुळे या दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. चौपदरीकरणाच्या रखडलेल्या कामाबाबत अॅड. ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 7 जुलैला सुनावणी झाली. न्यायालयाच्या सूचनेनुसार आता घाटात दोन ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

सुनावणीवेळी न्यायालयाने परशुराम घाटाच्या रखडलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त केली. दरडी कोसण्याचा धोका असलेल्या ठिकाणी सीसीटिव्ही कॅमेरे बसवून घाटावर नजर ठेवण्याच्या सूचना न्यायाधीश मेनन आणि कर्णिक यांनी दिल्या. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणी हॅलोजन लाईटसह अन्य उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत . मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात सहा दरडप्रवण क्षेत्रात दोन कंत्राटदार कंपन्यांच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. यातूनच गुरूवारपासून सीसीटीव्ही कॅमेरे घाटात बसवण्यात आले आहेत.

कल्याण टोलवेज कंपनीकडून घाटातील वरच्या बाजूस चार ठिकाणच्या दरडप्रवण क्षेत्रात कॅमेरे बसवण्यात आले आहे. याच ठिकाणी शेडमध्ये त्याचे नियंत्रण युनिट बसवण्यात आले आहे. तेथे 24 तास कर्मचारी लक्ष ठेवत आहे, तर ईगल इन्फ्राकडून 2 ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. घाट बंदच्या कारणामुळे खेड, दापोली या राज्य परिवहन मंडळांच्या आगारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबरोबरच वाहतूक व्यावसायिक, ट्रक, कंटेनर चालक यांना जवळपास दररोज मनस्ताप सहन करावा लागत आहे. चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या योग्य नियोजनाअभावी प्रशासनावर घाट बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली असल्याबद्दल प्रवाशी आणि वाहतूकदार यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
1:47 PM 25-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here