लांजा तालुक्याला मुसळधार पावसाचा जोरदार तडाखा बसला असून मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी येथील काजळी व वाकेड येथील मुचकुंदी नद्यांनी रुद्रावतार धारण केल्याने दोन्ही पूर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग तब्बल 10 तास ठप्प होता. दरम्यान, खोरनिनको येथे भला मोठा डोगर कोसळून दोन घरे मातीखाली गाडली गेली आहेत. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नसली तरी दोन घरांचे एकूण साडे नऊ लाखांचे नुकसान झाले. खोरनिनको येथील मुचकुंदी धरण प्रकल्प सुरु असून एक किमी अंतरावर 23 घरांचे पुनवर्सन करण्यात आले आहे. यातील काही घरे बंद असून काही घरांमध्ये वास्तव्य आहे. रविवारी मध्यरात्री मुसळधार पावसामुळे घराशेजारी असलेल्या डोंगराचा अर्धा भाग तुटून त्याखाली यातील दोन घरांवर कोसळला. यात दोन्ही घरे जमीनदोस्त झाली असून अनुसया कदम यांच्या घराचे 6 लाख 29 हजार 450 रुपयांचे नुकसान तर जयवंत नारायण माजळकर यांच्या बद घराचे 2 लाख 55 हजार 100 रुपयांचे नुकसान झाले.
