कोरोनानंतर आता वेगाने पसरणाऱ्या मंकीपॉक्समुळे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. डब्ल्यूएचओचे महासंचालक डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस म्हणाले की, मांकीपॉक्सचा उद्रेक हा मोठा चिंतेचा विषय आहे.
या क्षणी मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव बायसेक्शुअल पुरुषांमध्ये यौन संबंधानंतर होत असल्याचेही टेड्रोस यांनी सांगितले.
मंकीपॉक्सबाबत अनेक गैरसमज
डब्ल्यूएचओ प्रमुखांच्या मते, कोरोनाप्रमाणे मंकीपॉक्सही योग्य उपाययोजना केल्यानंतर थांबवता येऊ शकतो. भेदभाव हा एखाद्या विषाणूइतका धोकादायक आहे. त्यामुळे ज्यांना एचआयव्ही ग्रस्त लोकांसोबत काम करण्याचा अनुभव आहे, अशा सामाजिक संस्थांना मी आवाहन करतो की, त्यांनी या मंकीपॉक्सच्या उद्रेकाशी संबंधित भेदभावाविरोधात लढण्यासाठी आमच्यात सामील व्हावे.
दरम्यान, डब्ल्यूएचओचे दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालिक डॉ. पूनम खेत्रपाल सिंह म्हणाल्या की, मंकीपॉक्सची प्रकरणे पुरुषांशी संबंध ठेवणाऱ्यांमध्ये वाढत आहेत. ज्या देशांमध्ये यापूर्वी एकही रुग्ण आढळला नव्हता, त्या देशांमध्येही आता मंकीपॉक्सचा प्रसार वेगाने होत आहे. रोगाची बहुतेक प्रकरणे पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवणाऱ्यांमध्ये दिसत आहेत. WHO ने दक्षिण-पूर्व आशिया क्षेत्रातील देशांना मांकीपॉक्सवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आणि योग्य उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.
मंकीपॉक्स 75 देशांमध्ये पोहोचला
सध्या 75 देशांमध्ये मंकीपॉक्सची 16000 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. दक्षिण-पूर्व आशियात मंकीपॉक्सची 5 प्रकरणे आढळून आली आहेत, त्यापैकी 4 भारतातील आणि एक थायलंडमधील आहे. मध्यपूर्वेतून परतलेल्या नागरिकांमध्ये भारतातील प्रकरणे आहेत. मात्र यापैकी एका रुग्णाची कोणतीही ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. तर थायलंडमध्ये राहणाऱ्या एका परदेशी व्यक्तीला मंकीपॉक्सची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
