कारगिल विजय दिनानिमित्त आज देशभरात तिरंगा रॅलींचे आयोजन

0

मुंबई : कारगिल विजय दिनानिमित्त आज देशाप्रमाणेच महाराष्ट्रातदेखील ठिकठिकाणी प्रभात फेऱ्यांचं आयोजन करण्यात येत आहे. 26 जुलै 1999 हा दिवस भारतीय सैन्याचा शौर्याचा दिवस मानला जातो.

याच दिवशी कारगिल येथील युद्धात भारताने विजयी ध्वज फडकवला होता. श्रीनगर जिल्ह्यातील कारगिलमधील अनेक चौक्यांवर पाकिस्तानी सैन्यानं कब्जा केला होता. भारत सरकारने या घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी ऑपरेशन विजय आखले. जवळपास दोन महिन्यांपेक्षा जास्त हे युद्ध चालले. अखेर 1999 मध्ये जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत भारताचे हे ऑपरेशन चालले. युद्धात जवळपास 527 भारतीय सैनिक शहीद झाले. सुमारे 2 लाख सैनिकांनी यात सहभाग घेतला होता. या सैन्याच्या शौर्याला सलामी देण्याकरिता दरवर्षी २६ जुलै रोजी देशभरात तिरंगा रॅली काढण्यात येते.

लालचौकातून अखंडतेसाठी तिरंगा रॅली
जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर येथील ऐतिहासिक लाल चौकावरून सोमवारी भाजपतर्फे मोटरसायकल रॅली काढण्यात आली. राष्ट्रीय एकता आणि अखंडतेचा संदेश देत सोमवारी 300 पेक्षा बाईकर्सनी तिरंगा ध्वज हातात घेत कारगिल युद्ध स्मारकापर्यंत रॅली काढली. भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या नेतृत्वाखाली ही रॅली काण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय महासचिव तरुण चुग यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही रॅली सुरु झाली. यावेळी भाजप नेते रविंद्र रैना, प्रदेश भाजपा महासचिव सुनील शर्मा, खासदार आणि भाजयुमोचे अध्यक्ष तेजस्वी सूर्यादेखील उपस्थित होते. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 26 जुलै रोजी विजयदिनानिमित्त कारगिलमध्ये ही रॅली काढली जाईल.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह काय म्हणाले?
कारगिल विजय दिनानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी देशाला संबोधित केलं. देशाकडे वक्रदृष्टीने पाहणाऱ्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य सज्ज आहे, असे ते म्हणाले. यापुढे कोणतेही युद्ध झाले तरीही त्यात भारताचाच विजय होईल. पाक व्याप्त काश्मीर हा भारतातच भाग असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ते म्हणाले, 1965 ते 1971 पर्यंत प्रत्येक युद्धात पराभव झाल्यानंतर पाकिस्तानने छुप्या पद्धतीने घुसखोरी केली. दोन दशकांहून अधिक पाकिस्तानने आपल्या काश्मीरचा भाग स्वतःच्या ताब्यात ठेवला. मात्र भारताच्या अखंडतेला कुणीही भंग करू शकत नाही, हेच दाखवून दिले, त्यामुळेच हा दिवस आपण तेवढ्याच अभिमानाने साजरा केला पाहिजे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 AM 26-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here