वॉशिंग्टन – कोरोना व्हायरसमुळे जगभरात हाहाकार माजला आहे. इटली, स्पेननंतर आता अमेरिकेमध्ये जास्त प्रमाणात लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. गेल्या २४ तासात अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूंमध्ये दुप्पटीने वाढ झाल्याचं दिसून येतंय. गेल्या २४ तासात अमेरिकेत तब्बल ८६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील मृतांचा आकडा झपाट्याने वाढत असून मृतांची संख्या ४ हजारांच्या जवळपास पोहोचली आहे. जॉन हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील मृतांची संख्या ४०७६ वर पोहोचली आहे, जी शनिवारी नोंद करण्यात आलेल्या मृतांच्या आकडेवारीपेक्षा दुप्पट आहे. अमेरिकत शनिवारी मृतांचा आकडा २०१० एवढा होता. मात्र, गेल्या दोन ते तीन दिवसांत या आकड्यांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. व्हाईट हाऊसचे समन्वयक डेबोराह बीरक्स यांनी पत्रकारांना माहिती देताना, अमेरिकेत १ लाख ते २ लाख नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो, अशी भिती व्यक्त केली आहे. तसेच, आम्ही दररोज परिस्थिती नियंत्रणात आणण्यसाठी सर्वाधिक प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
