चीनच जगासाठी सर्वात मोठा धोका : ऋषी सुनक

0

ब्रिटनमध्ये सुरू असलेली पंतप्रधानपदाची शर्यत आता चीन आणि या देशाच्या विस्तारवादी भूमिकेवर येऊन ठेपली आहे.

पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या लिझ ट्रस यांनी ऋषी सुनक यांच्यावर चीनबाबत कमकुवत भूमिका घेतल्याचा आरोप केला. त्यावर आता सुनक यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यांनी चीन जगासाठीचा सर्वात मोठा धोका असल्याचं तर म्हटलंच पण पंतप्रधान झाल्यास काय कारवाई केली जाईल याचीही माहिती दिली आहे.

सध्या संपूर्ण जगासाठी चीन धोका आहे असं ऋषी सुनक यांनी स्पष्ट केलं. ज्यापद्धतीनं चीननं अमेरिका आणि भारताला लक्ष्य केलं आहे ते पाहता त्या देशाची नियत लक्षात येते. चीन तांत्रिकदृष्ट्या आपली आक्रमकता दाखवून देत आहे आणि नवनव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून दुसऱ्या देशांमध्ये हस्तक्षेप करणं सुरू आहे. हे रोखण्यासाठी नाटोसारखी आणखी एक संघटना स्थापन करण्याची गरज असल्याचं सुनक यांनी म्हटलं आहे. जगातील स्वतंत्र्य देशांनी आता अशी एक संघटनेची स्थापना करावी की जी चीनच्या आक्रमकतेला रोखण्याचं काम करेल, असं सुनक म्हणाले.

चीनकडून बऱ्याच कालावधीपासून तंत्रज्ञान चोरी सुरू असल्याचाही आरोप ऋषी सुनक यांनी केला. चीन सध्या देशातील विद्यापीठांमध्ये घुसखोरी करत आहे आणि तैवान सारख्या देशांना घाबरवण्याचं काम करत आहे, तर हाँगकाँगमध्ये मानवाधिकार नियमांचं उल्लंघन केलं जात आहे, असं सुनक म्हणाले. चीनच्या विस्तारवादी भूमिकेचा उल्लेख करत सुनक यांनी चीन इतर देशांना कर्जाच्या ओझ्याखाली दाबून विस्तारवादी रणनितीला पुढे नेत असल्याचं ते म्हणाले.

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर सर्वात आधी ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या 30 Confucius Institutes बंद करण्यात येतील. ज्यांचं संचालन चीनकडून सुरू आहे, असं ऋषी सुनक म्हणाले. याच संस्थांच्या माध्यमातून चीनी प्रपोगेंडा पुढे रेटण्याचं काम चीन करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

चीनच्या गुप्तहेरीच्या इराद्यांना नाकाम करण्यासाठी ब्रिटनच्या स्थानिक गुप्तहेर संघटना MI5 चा वापर केला जाईल असंही सुनक म्हणाले. ब्रिटनमध्ये काम करणाऱ्या सर्व कंपन्यांना सुरक्षा देखील दिली जाईल. चीनच्या बाबतीत कठोर भूमिका घेत ऋषी सुनक यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानच्या निवडणुकीत मोठा फासा टाकला आहे. चीनच्या बाबतीत नरमाईची भूमिका घेतली गेल्याचा आरोप होताच ऋषी सुनक यांनी आक्रमक पवित्रा घेत आपले इरादे स्पष्ट करत मतदारांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:24 PM 26-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here