राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर नीरज चोप्रा भावूक..

0

नवी दिल्ली : सध्या क्रीडा विश्वात राष्ट्रकुल स्पर्धेचे वादळ वाहू लागले आहे. मात्र भारताला या स्पर्धेच्या पूर्वसंध्येलाच एक मोठा झटका बसला.

कारण भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा आपल्या पायाच्या दुखापतीमुळे राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ (CWG 2022) मधून बाहेर झाला आहे. अचानक आलेल्या खळबळजनक बातमीमुळे नीरजच्या चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला. दरम्यान नीरजने चाहत्यांसाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी न झाल्याने मला दु:ख झाले आहे, असे नीरजने पोस्टच्या सुरूवातीला म्हटले. त्याला वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप दरम्यान दुखापत झाली होती. अलीकडेच पार पडलेल्या या चॅम्पियनशिपमध्ये नीरजने रौप्य पदक पटकावून भारताचा तब्बल १९ वर्षांचा दुष्काळ संपवला. तसेच या चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या खात्यात पहिल्यांदाच रौप्य पदक आले आहे.

नीरजने केली भावनिक पोस्ट
नीरजने भावनिक पोस्ट करत म्हटले, “अत्यंत दु:खी मनाने तुम्हाला सांगावे लागत आहे की मी यावेळीच्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकत नाही. मला वर्ल्ड ॲथलेटिक्स दरम्यान झालेल्या दुखापतीमुळे त्रास जाणवत होता आणि काल इथे अमेरिकेत या दुखापतीची चाचणी केल्यानंतर छोटी दुखापत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मला एक आठवडा विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.”

“मला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत मी आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करू शकणार नाही. सध्या माझे पूर्ण लक्ष विश्रांतीवर असेल, ज्यामुळे मी लवकरच मैदानात उतरण्याचा प्रयत्न करेन. देशवासीयांकडून जेवढे प्रेम आणि सन्मान मिळाला आहे, त्यासाठी सर्वांचे आभार मानायचे आहेत.” अशा शब्दांत नीरजने समस्त भारतीयांचे आभार मानले.

वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला होता इतिहास
टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राने आपला विजयरथ कायम ठेवत चॅम्पियनशिपमध्ये देखील भरघोस यश मिळवले. २४ जुलै रोजी अमेरिकेत पार पडलेल्या वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरजने रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. ८८.१३ मीटर लांब भाला फेकून आपल्या देशाचा तब्बल १९ वर्षांचा दुष्काळ संपवला. १९ वर्षांपूर्वी अर्थात २००३ मध्ये पहिल्यांदा भारताच्या कोणत्या खेळाडूला चॅम्पियनशिपमध्ये पदक पटकावण्यात यश आले होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 PM 27-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here