”रामदास कदम ही मुलुखमैदानी तोफ पुन्हा एकदा मैदानात धडाडावी हीच अपेक्षा”

0

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर पक्ष वाचविण्याचे नवे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

दुसरीकडे, राज्यभरातून शिंदे गटाला मोठा पाठिंबा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आदित्य ठाकरे हेदेखील मैदानात उतरले असून, ठाकरे पिता-पुत्र ऑगस्टमध्ये राज्याचा दौरा करून शिवसेनेत पुन्हा एकदा नवचैतन्य भरणार असल्याची चर्चा सुरू आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रामदास कदम यांची भेट घेऊन वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त एकनाथ शिंदे त्यांच्या मुंबईतील कांदिवली येथील पालखी या निवासस्थानी पोहोचले. रामदास कदम यांच्यासारखा आक्रमक नेता पक्षासाठी आवश्यक असल्याचे सूतोवाचही केले. उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या समर्थक नेत्यांवर जोरदार हल्लाबोल सुरू केलाय. गेल्या अनेक दिवसांपासून ते उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत वेगवेगळे आरोपही करत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना कदम यांनी तर ठाकरेंवर घणाघाती टीका करत लक्ष वेधून घेतले.

मुलुखमैदानी तोफ पुन्हा एकदा मैदानात धडाडावी
राज्यात शिवसेना, भाजपा व सहयोगी पक्षांचे युती सरकार स्थापन झाल्यावर शिवसेनेचा भगवा मंत्रालयावर डौलाने फडकत असतानाच रामदास कदम नावाची मुलुखमैदान तोफ पुन्हा एकदा पक्षबांधणीसाठी मैदानात यावी अशी अपेक्षा यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केली. आपल्या राजकीय आयुष्याची ही इनिंग रामदास कदम यांनी पुन्हा त्याच जोशात सुरू करावी याच शुभेच्छा त्यांनी यावेळी कदम यांना दिल्या. यावेळी रामदास कदम यांचे दोन्ही सुपुत्र आमदार योगेश कदम आणि सिद्धेश कदम, आमदार बालाजी कल्याणकर आणि कदम कुटुंबीय उपस्थित होते.

दरम्यान, उद्धव ठाकरेंना माजी मुख्यमंत्री म्हणूनच शुभेच्छा देईन. शरद पवारांचे नेतृत्व सोडून बाळासाहेबांच्या विचारांचे नेतृत्व ठेवले असते तर त्यांना मी निश्चितपणे शिवसेनेचे प्रमुख म्हटले असते. मात्र ते बाळासाहेबांचे सुपुत्र म्हणून काम पाहत नाहीत, तर ते शरद पवार यांच्या मांडीवर बसून त्यांच्या विचारांशी सहमत होऊन काम करताहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमाई, बाळासाहेबांच्या पाठीत खंजिर खुपसण्याचे काम, बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी ही दुर्दैवाने उद्धव ठाकरेंकडून झाली आहे, अशी खरमरीत टीका रामदास कदम यांनी केली होती.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 PM 28-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here