दोन दिवस मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले असून, अद्यापही काही भागात पूरसदृश स्थिती कायम आहे. दोन दिवस झालेल्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक भागात पडझड झाली असून, यामध्ये सुमारे अर्धा कोटी मालमत्तेचे नुकसान जिल्हा नियंत्रण कक्षाने नोंदवले आहे. मंगळवारी जिल्ह्यात १२०.११ मि.मी. सरासरीने १८१ मि.मी. पाऊस झाला. दरम्यान आगामी तीन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा निर्वाळा हवामान खात्याने दिला आहे. चिपळूण, दापोली आणि राजापूर या तीन तालुक्यात अद्यापही पूररेषेखाली असून, मंगळवारी काही भागात पावसाने उसंत घेतल्यामुळे येथील पूरस्थिती जैसे थे स्थितीत आहे. मंगळवारी दिवसभरात सर्वाधिक पाऊस चिपळूण तालुक्यात अद्यापही कायम असून, येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंडणगड आणि दापोलीमध्ये प्रत्येकी १३० मि.मी., खेडमध्ये १५५, गुहागर ७९, चिपळूण १७५, संगमेश्वर ९७, रत्नागिरी ६४, लांजा आणि राजापूर तालुक्यात अनुक्रमे १०४ आणि १४७ मि.मी. पावसाची नोंद झाली. गेले दोन दिवस पावसाने १५० मि.मी.पेक्षा जास्त सरासरीने पर्जन्यमान राखल्याने अनेक भागात पडझडीची नोंद झाली आहे. यामध्ये मंडणगड तालुक्यात पेवे म्हाप्रळ रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे या भागातील वाहतूक बाधित झाली आहे.खेड येथेखोपी-वेरळ रस्त्यावर झाड पडल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली. चिपळूण तालुक्यात आडे पूल येथे पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.
