भारताला उझबेकिस्तानकडून आंबा, केळी आणि सोयाबीनच्या निर्यातीसाठी मान्यता

0

नवी दिल्ली : उझबेकिस्तानचे उपपंतप्रधान जमशीद खोडजाव यांनी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची नवी दिल्लीत भेट घेतली.

या दोघांच्या बैठकीत दोन्ही देशातील कृषी क्षेत्राशी संबंधीत बाबींवर चर्चा झाली. तसेच दोन्ही देशांमधील कृषी क्षेत्रात सुरु असलेले सहकार्य वाढवण्यावर देखील यावेळी सहमती झाली. यावेळी नरेंद्र सिंह तोमर यांनी उझबेकिस्तानचे उपपंतप्रधान म्हणून खोडजाव यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छाही दिल्या.

उझबेकिस्तानचे उपपंतप्रधान म्हणून खोडजाव यांची नियुक्ती झाली आहे. या नियुक्तीबद्दल त्यांना कृषीमंत्री तोमर यांनी शुभेच्छा दिल्या. खोडजाव यांचा देशाचे कृषीमंत्री म्हणून पूर्वीचा अनुभव त्यांच्या नवीन कार्यभारासाठी खूप उपयुक्त ठरेल असे तोमर म्हणाले. दोन्ही देशांमध्ये अतिशय चांगले राजनैतिक आणि व्यापारी संबंध आहेत. कृषी क्षेत्रात परस्पर सहकार्यावर विशेष लक्ष दिल्याबद्दल तोमर यांनी आनंद व्यक्त केला.

उझबेकिस्तानसाठी भारतीय बाजारपेठ उपलब्ध
भारताने उझबेकिस्तानमधील द्राक्षे, आलुबुखार आणि गोड चेरीसाठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील अधिसूचना लवकरच प्रकाशित केली जाईल असे तोमर यांनी सांगितले. तर भारताला आंबा, केळी आणि सोयाबीन ऑइलकेकच्या निर्यातीसाठी उझबेकिस्तानकडून मान्यता मिळाली आहे, यासाठी तोमर यांनी खोडजाव यांचे आभार मानले. डाळिंब, बटाटा, पपई आणि गहू आयात करण्याची परवानगी त्वरित देण्याचे आवाहन देखील तोमर यांनी उझबेकिस्तानला केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कृषी क्षेत्राचा झपाट्याने विकास होत असून, शेतकऱ्यांच्या हिताच्या विविध पैलूंवर मोठ्या उत्साहाने काम केले जात असल्याचे तोमर यांनी सांगितले.

भारताप्रमाणेच उझबेकिस्तानमधील शेतीची दिशा बदलायची आहे : जमशीद खोडजाव
दरम्यान, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाबद्दल भारताचे अभिनंदन करताना खोडजाव म्हणाले की, भारताचा कृषी क्षेत्रातील अनुभव खूप चांगला आहे. त्याविषयी तसेच शेतकऱ्यांना दिलेल्या पाठबळाविषयी उझबेकिस्तानला जाणून घ्यायचे आहे. भारताप्रमाणेच, आम्हाला उझबेकिस्तानमधील शेतीची दिशा बदलायची आहे. ज्यासाठी आम्हाला भारताकडून शिकायचे असल्याचे जमशीद खोडजाव म्हणाले. या संदर्भात त्यांनी भारतीय कृषी संशोधन संस्थांना संशोधन आणि विकासाचे फायदे उझबेकिस्तानला सामायिक करण्याची विनंती केली. भारतीय शेतीमधील डिजिटायझेशनच्या वाढत्या प्रवृत्तीचे कौतुक करुन खोडजाव यांनी भारतीय कंपन्यांसह उझबेकिस्तानमध्येही असेच डिजिटायझेशन करण्याचा मानस व्यक्त केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:19 PM 29-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here