रत्नागिरीत जिल्हा परिषदेतील मातब्बरांचे पत्ते कट

0

रत्नागिरी : जिल्हा परिषद गटात अकरापैकी सात ठिकाणी महिला आरक्षण पडल्यामुळे विद्यमान सहा सदस्यांचा पत्ता कट झाला असून, दोघांना त्याच मतदार संघातून पुन्हा संधी मिळू शकते. पत्ते कट झालेल्यांमध्ये ज्येष्ठ सदस्य उदय बने, बाबू म्हाप, परशुराम कदम, प्रकाश रसाळ यांचा समावेश आहे. त्यांना नवीन मतदार संघ शोधावे लागणार आहेत.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारसंख्येच्या आधारावर गटांची रचना बदलण्यात आली. त्यामुळे दहा गटांचे अकरा गट झाली आहेत. अनेक गावे एका गटातून दुसर्‍या गटात समाविष्ट झाल्याने आधीच इच्छुकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर गुरुवारी (ता. २८) पडलेल्या आरक्षण सोडतीत आरक्षित गटात अनेक इच्छुकांचे हिरमोड झाले आहेत. वाटद गट सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्यामुळे विद्यमान ॠतुजा जाधव यांचा पत्ता कट झाला आहे. या ठिकाणी सर्वच पक्षांना नव्याने उमेदवार शोधावा लागणार आहे.

कोतवडे गटात विद्यमान साधना साळवी यांना पूरक असे सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. त्यांना याच गटातून शिवसेनेकडून पुन्हा संधी मिळू शकते. आरक्षण बदलेल अशी शक्यता असल्याने गजानन पाटील, भाजपकडून सतीश शेवडे हे इच्छुकांमध्ये होते. करबुडे गटातून शिवसेनेचे उदय बने यांचा पत्ता कट झाला आहे. त्यांना अन्य मतदार संघ शोधावा लागणार आहे. या ठिकाणी बाबू म्हाप यांना उमेदवारी दिली जाऊ शकते. संपूर्ण तालुक्यात गोळप आणि कुवारबाव गट अनारक्षित आहेत. तेथे सेनेकडून मंगेश साळवी, नंदा मुरकर इच्छुकांमध्ये आहेत. त्यातून बने कसा तोडगा काढणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

हातखंबा, नाचणे येथे महिलांसाठी आरक्षण असल्याने परशुराम कदम, प्रकाश रसाळ यांना नवीन मतदार संघ शोधावे लागू शकतात. त्यांच्यासाठी कुवारबाव मतदार संघ उपयुक्त ठरू शकतो. या ठिकाणी हरचेरीचा भाग समाविष्ट असल्यामुळे महेंद्र झापडेकर यांचे नाव घेतले जात आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 30-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here