मिशन वात्सल्यसह महिला बाल विकासच्या विविध कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

0

रत्नागिरी : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या विविध समित्यांच्या कामकाजाचा आढावा शुक्रवारी जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी घेतला.

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. बी. काटकर, जिल्हा बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड. संदेश शहाणे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी समृद्धी वीर, जिल्हा परिवीक्षा अधिकारी ए. डी. भोसले, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी अधिकारी उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कृतीदल समिती, जिल्हा परिवीक्षा समिती, जिल्हा बाल सरंक्षण समिती, जिल्हा महिला कल्याण समिती, वन स्टॉप सेंटर व्यवस्थापकीय समिती, जिल्हा पुनर्वसन समिती या समित्यांचा आढावा यावेळी घेण्यात आला.

मिशन वात्सल्य योजनेसंदर्भात आढावा घेताना जिल्हाधिकारी म्हणाले, या योजनेअंतर्गत येणाऱ्या २५ योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यासाठी ज्यांनी अर्ज केलेला नाही त्यांच्याकडून अर्ज घेण्यासाठी संबंधित विभागाने पाठपुरावा करावा. लाभ देण्यासाठी कॅम्पचे आयोजन करावे. विधवा महिलांना वारसा हक्क प्रमाणपत्र प्राप्त करून देताना त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून द्यावी.

जिल्हा बाल संरक्षण समितीचा आढावाच्या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बालगृह व निरीक्षणगृहात दाखल मुल/मुली, निरीक्षणगृह, बालगृहात दिलेल्या भेटी, करोनाच्या पार्श्वभूमीवर एक पालक आणि दोन पालक गमावलेल्या बालकांच्या संदर्भात बालसंगोपन योजनेच्या लाभासाठी केलेली कार्यवाही, दत्तक बालक कार्यवाही, जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत समुपदेशन आदींची माहिती घेतली.

वन स्टॉप सेंटर व्यवस्थापकीय मंडळाची दर महिन्याला बैठक घेऊन त्या बैठकीतील केलेल्या कार्यवाहीबाबत बैठकीचे इतिवृत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत सादर करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here