पीक विमा योजनेला शेतकऱ्यांकडून अत्यल्प प्रतिसाद 

0

रत्नागिरी : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकर्‍यांकडून भात आणि नाचणी क्षेत्राचा विमा काढण्यात अल्प प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १६०८ शेतकर्‍यांनी ३३७.९५ हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवला आहे. गतवर्षीच्या तुलनेत पन्नास टक्केच शेतकर्‍यांचा प्रतिसाद लाभला असून योजनेत सहभागाची अंतिम मुदत ३१ जुलै २०२२ आहे.

विमा उतरवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याकरिता शासनाकडून युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी नियुक्त करण्यात आली आहे. ही योजना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी असून सर्व कर्जदार व बिगर कर्जदार शेतकर्‍यांना योजना ऐच्छिक आहे. कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी भाग घेण्यास पात्र आहेत. शेतकरी विमा हप्ता खरिप हंगामासाठी २ टक्के, तसेच रब्बी हंगामासाठी १.५ टक्के तसेच खरिप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी ५ टक्के असा आहे. भात पिकासाठी ५० हजार विमा संरक्षित रक्कमेसाठी  विमा हप्ता रक्कम १ हजार रुपये तर नाचणीसाठी २० हजार रुपये विमा संरक्षित रक्कमेसाठी विमा हप्ता रक्कम ४०० रुपये आहे. खरीप हंगामात आतापर्यंत १६०८ शेतकर्‍यांमधील १५४५ जणांनी भात क्षेत्र तर ६३ शेतकर्‍यांनी नाचणी क्षेत्राचा विमा उतरवला आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र मंडणगड तालुक्यातील आहे; मात्र यावर्षी विमा उतरवण्यास शेतकर्‍यांकडून कमी प्रतिसाद मिळत आहे. रत्नागिरी तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत ३० टक्केच शेतकर्‍यांनी विमा उतरवला आहे. गतवर्षी तालुका कृषी अधिकार्‍यांनी मंळडनिहाय योग्य पध्दतीने नियोजन केले होते. त्यामुळे ९५४ जणांनी विमा उतरवला होता. यंदा १३८ शेतकर्‍यांनी विमा उतरवलेला आहे. यंदा मंडणगड तालुक्यात सर्वाधिक ६६१ शेतकर्‍यांनी विमा उतरवला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
5:36 PM 30-Jul-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here