➡ मात्र खवटी रेल्वे स्टेशनजवळ सर्व प्रकार उघड
रत्नागिरी : करोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन आणि त्यानंतर संचारबंदी अंमलात आणल्यामुळे पुणे, मुंबई आदी शहरी भागातील अनेकांनी गावी येण्यास सुरुवात केली आहे. संचारबंदी असल्यामुळे गावी परतण्यासाठी अनेकजण अनेक प्रकारच्या शक्कली लढवत आहेत. त्याचप्रमाणे मुंबईतून कोकणात आपल्या मुळ गावी येण्यासाठी सुमारे २५ चाकरमान्यानी कोकण रेल्वेच्या रूळावरून चालत येण्याचा मार्ग अवलंबला. पायी चालत खेडपर्यंत येत असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर खेड प्रशासनाने त्यांना ताब्यात घेवून त्यांची व्यवस्था तालुका बंदीस्त क्रिडासंकुलात केली आहे. रेल्वे रूळावरून जाताना त्यांना कोणीही अडवले नाही. पण आज खेड जवळील खवटी रेल्वे स्टेशन जवळ हे चाकरमानी जेवण बनवत असता पोलिसांनी त्यांना हटकले असता सर्व प्रकार उघड झाला. रत्नागिरी जिल्ह्यात आल्यानंतर मात्र त्यांना पुढे जाण्यास जिल्हा प्रशासनाने बंदी केली. रायगड पोलिस तसेच कोकण रेल्वेच्या मार्गावरील एकाही स्टेशनवर या २५ जणांना का अडवण्यात आले नाही असा प्रश्न आता पुढे आला आहे.
