कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता ‘महाकवच ॲप’ शासनाच्या मदतीला

0

कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासनाचे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, नाशिक डिस्ट्रिक्ट इनोव्हेशन कौन्सिल आणि नाशिक महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने डिजिटल प्लॅटफॉर्म्सची निर्मिती करण्यात आली आहे. ‘नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर’ ही या प्लॅटफॉर्म्सची ठळक वैशिष्ट्ये आहेत.

महाकवच ॲप
या डिजिटल प्लॅटफॉर्मची दोन मुख्य वैशिष्ट्ये आहेत. पहिले म्हणजे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि दुसरे- क्वारंटाइन ट्रॅकिंग कॉन्टॅक्ट ट्रेसिंग म्हणजे कोरोनाबाधित व्यक्ती ही अन्य कोणाच्या संपर्कात आली होती का, याचे ट्रेसिंग. अशा व्यक्तीने स्मार्टफोन बाळगला असल्यास त्याच्याआधारे ती व्यक्ती नेमक्या किती आणि कोणकोणत्या व्यक्तीच्या संपर्कात आली होती याचे ट्रेसिंग करणे या ॲपमुळे शक्य होणार आहे. शिवाय, अशी व्यक्ती हॉटेल, रेस्टॉरंट, धार्मिक स्थळे, रेल्वे स्टेशन अशा कोणत्या गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी वावरली होती याचे ट्रेसिंगही महाकवच अॅपमुळे अचूकपणे आणि कमीत कमी वेळेत होणार आहे. सध्या ही तपासणी प्रशासनाला मॅन्युअल पद्धतीने म्हणजे प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना पाठवून करावी लागते. यात वेळही खूप जातो. पण आता ‘महाकवच’मुळे प्रशासनाला कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी निश्चित दिशेने प्रयत्न करता येतील आणि तेही कमीत कमी वेळेत. महाकवच प्लॅटफॉर्मचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे क्वारंटाइन ट्रॅकिंग जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार, कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, परदेशातून आलेली व्यक्ती किंवा संशयित रुग्ण यांनी किमान 14 दिवस स्वतःचे विलगीकरण म्हणजेच क्वारंटाइन करणे अतिशय आवश्यक असते. पण, बऱ्याचदा लोक निष्काळजीपणा दाखवतात व नियमांचे उल्लंघन करून अनेकांच्या संपर्कात येतात. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग वाढत जातो. पण आता अशा व्यक्तींच्या स्मार्ट फोनमध्ये जेव्हा महाकवच ॲप इनस्टॉल केले जाईल तेव्हा अशा व्यक्तींचे क्वारंटाइन ट्रॅकिंगही डिजिटली करता येणार आहे. याची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे जिओ फेन्सिंग व सेल्फी अटेंडन्स होय. अशा व्यक्तींना एका मर्यादित त्रिज्येतच वावरण्याची मुभा असेल. जेव्हा ही त्रिज्या ओलांडली जाईल तेव्हा ॲपद्वारे ही माहिती प्रशासनाला समजेल. यानंतर योग्य ती कार्यवाही प्रशासनातर्फे होणार आहे. या ॲपचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सेल्फी अटेंडन्स. प्रशासनाकडून जेव्हा जेव्हा विचारणा होईल तेव्हा अशा व्यक्तीला सेल्फी काढून तो ॲपद्वारे प्रशासनाकडे पाठवावा लागेल. महाकवच ॲप हे गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून ते केवळ कोरोना लक्षणीत व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलेल्या व्यक्तींसाठी आहे. फक्त अशाच व्यक्ती हे ॲप वापरू शकतात. इतर लोकांना मात्र हे ॲप वापरण्याची परवानगी नसेल याचबरोबर, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीकडून ‘सेल्फ असेसमेंट टूल’चीही निर्मिती करण्यात आली असून ते लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here