सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या 5 पैकी एकमेव कासव संपर्कात

0

रत्नागिरी : ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवांच्या अभ्यासासाठी सॅटेलाइट टॅगिंग केलेल्या पाच पैकी वनश्री हे एकमेव कासव संपर्कात आहे. काही दिवसांपुर्वी संपर्क तुटलेले रेवा हे चौथे कासव ठरले. मागील सहा महिन्यातील निरीक्षणांवरुन या कासवांचे कायम वास्तव्य हे अरबी समुद्रातील असावे, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच ती अति खोल समुद्रात प्रवास करत जात नसावीत यालाही पुष्टी मिळाल्याचे अभ्यासक सांगत आहे.

कोकण किनारपट्टीवर अनेक ठिकाणी ऑलिव्ह रिडले जातीची कासवं अंडी घालण्यासाठी येतात. गेल्या काही वर्षांत त्यांचे प्रमाण वाढले आहे. ही कासवं एका किनार्‍यावर अंडी घालून गेली की, त्यांचा पुढील प्रवास कसा होतो, ती कोठून येतात. याचा अभ्यास करण्यासाठी वनविभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानमार्फत वेळास, आंजर्ले, गुहागर येथील किनार्‍यांवरुन सॅटेलाइट टॅगिंग करुन पाच कासवे समुद्रात सोडण्यात आली. त्यांच्या नोंदीही घेतल्या जात आहेत. काही कालावधीतच लक्ष्मी कासवाचा संपर्क तुटला.

त्यानंतर ’प्रथमा’ आणि सावनी संपर्काबाहेर गेली. प्रथमाने गुजरातच्या किनार्‍यापर्यंत प्रवास केला होता. पावसाळा तोंडावर आल्यानंतर सर्वच कासवांचा प्रवास दक्षिण किनार्‍याकडे सुरु झाला होता. जुन महिन्याच्या अखेरीस रेवा चा संपर्क तुटला. ते १५ फेब्रुवारी ला गुहागर येथुन टॅग करुन सोडण्यात आले होते. ट्रान्समीटरमधील बिघाडामुळेच ती संपर्का बाहेर गेल्याचे अभ्यासकांचे मत आहे. रेवाने २ हजार ३२८ किलोमीटर अंतर कापले असून ते कारवार, कर्नाटकच्या किनार्‍यापासून सुमारे ९० किलोमीटर अंतरावर डुबकी मारत होते. ही रेवाची शेवटची नोंद होती. याला कांदळवन कक्षाकडूनही दुजोरा मिळाला आहे. सध्या वनश्री हे एकमेव कासव संपर्कात असून ते मालवण किनार्‍यापासून काही अंतरावर समुद्रात डुबकी घेत आहे.

पाचपैकी चार कासवांचा संपर्क तुटला असला तरीही अभ्यासकांनी महत्त्वाची निरीक्षणे नोंदवली आहेत. ऑलिव्ह रिडले ही अरबी समुद्रातच वास्तव्य करणारी आहेत. प्रथमा कासव गुजरातच्या दिशेने पुढे गेले होते; मात्र ते पुन्हा दक्षिणेकडे येऊ लागले. ती किनार्‍यापासून खोल समुद्रात ६० ते ९० किलोमीटर अंतरापर्यंतच प्रवास करत गेली होती. त्यानंतर ती पुन्हा किनार्‍याकडे परतली. यावरुन ती अतिखोल समुद्रात जात नसून खंडीय भागातच त्यांना राहण्याची सवय आहे. संपर्कात असलेल्या वनश्रीमुळे पावसाळ्यानंतर पुढील प्रवासाच्या नोंदी घेणे शक्य होईल. त्यामुळे अभ्यासकांची उत्सुकता वाढली आहे. पाचमधील सावनी कासवाने एकाच महिन्यात दोन वेळा अंडी घातली होती. यावरुन एकदा अंडी घातल्यानंतर ति पुन्हा अंडी घालू शकतात असा निष्कर्ष नोंदला गेला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
6:12 PM 04-Aug-22

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here