रत्नागिरी : राज्यात करोनाविषयक उपचारांसाठी ३० विशेष रुग्णालयांची घोषणा आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवार दि. ०२ एप्रिलला केली. त्यामध्ये रत्नागिरी जिल्हा रुग्णालय आणि कळंबणी (ता. खेड) उपजिल्हा रुग्णालयांचा समावेश आहे. केवळ करोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्यभरातील ३० रुग्णालये निश्चित करण्यात आली आहेत. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून राज्यभरात करोनाबाधितांच्या उपचारासाठी २३०५ खाटा उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली. याबाबतच्या अधिसूचनेमुळे या रुग्णालयांना संशयित आणि करोना निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे. राज्य शासनामार्फत करोना प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. राज्यात चाचण्यांची सुविधा वाढवितानाच आवश्यकता भासल्यास रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत. मात्र करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता करोना उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषित करण्यात आली असून त्यासाठी आरोग्य संचालकांनी अधिसूचना काढली आहे, असेही श्री. टोपे यांनी जाहीर केले. त्यानुसार रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात १०० तर कळंबणीच्या उपजिल्हा रुग्णालयात ५० खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयाच्या खासदार निधीतून झालेल्या नव्या इमारतीत ७५ खाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
